पालघर-(योगेश चांदेकर) संभाव्य कोरोनाची येणारी तिसरी लाट अधिक घातक ठरणार असून त्याचा फटका लहान मूलांना बसण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तिसरी मूंबई म्हणून वसई विरारकडे पाहिलं जातं.कोरोनाच्या येणा-या नवीन लाटेशी लढण्यासाठी पालिकेकडून काय नियोजन करण्यात आले आहे याबाबत पालघर लोकसभा क्षेत्राचे खासदार राजेंद्र गावीत यानी शुक्रवारी पालिका मुख्यालयात आयुक्त गंगाथरन डी व इतर पालिका अधिका-यांशी भेट घेऊन चर्चा केली.
कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही.त्यातच तिस-या लाटेची धोक्याची घंटी वाजत असून या लाटेशी मुकाबला करण्यासाठी पालिका पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती आयुक्त गंगाथरन डी यांनी दिली आहे. यासाठी विरार पश्चिम बोळींज येथे 150 बेडचे 0 ते 12 वयोगटातील मुलांसाठी लवकरच रूग्णालय सुरू करण्यात येणार असून त्या ठिकाणी 30 आय सी यू बेड व ऑक्सीजन काॅन्सेटेटरची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नालासोपारा येथेही मुलांसाठी 100 बेडचे कोवीड रूग्णालय सुरू करण्यात येणार आहे. पालिका नव्याने 8 आयसीयू रूग्णवाहिका खरेदी करणार असून प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे त्या उपलब्ध करण्यात येणार आहेत. विरार नालासोपारा सारख्या अतिसंवेदनशील भागावर जास्त लक्ष दिले जाणार आहे. लॅबटेस्टसाठी ऑटोरिक्षा सुरू करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
यावेळी खासदार राजेंद्र गावीत, आयुक्त गंगाथरन डी, उपायुक्त किशोर गवस,अभीयंता राजेंद्र लाड, मूख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके, शिवसेना जिल्हा प्रमूख वसंत चव्हाण, उपजिल्हा प्रमूख प्रविण म्हाप्रळकर,उपजिल्हा प्रमूख नवीन दुबे,उपजिल्हा प्रमूख दिलिप पिंपळे, तालुकाप्रमुख निलेश तेंडुलकर, माजी गटनेत्या किरण चेंदवणकर, निलेश देशमुख, मनिष वैद्य,गणेश भायदे उपस्थित होते.
संभाव्य तिस-या लाटेशी मुकाबला करण्यासाठी 8 ते 12 व 12 ते 18 वयोगटातील मूलांची नागपूर पॅटर्नवर अँटीबाॅडी टेस्ट केली तर त्याचे प्रमाण किती आहे हे लक्षात येईल.त्यासाठी काय उपाययोजना करता येतील हे पाहणे गरजेचे आहे. सद्या वसई विरार पालिका क्षेत्रातील खाजगी रूग्णालयात रूग्णांवर अवाजवी बिल लादले जाते यासंदर्भात आयुक्तांशी खासदार गावीत यांनी चर्चा केली.