banner 728x90

फडणवीसांना राजकीय संन्यास घेऊ देणार नाही; सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांची उपरोधिक भाषेत टीका

banner 468x60

Share This:

मुंबई: ‘पुन्हा सत्ता हाती आल्यास ओबीसींनी आरक्षण देईन आणि देऊ शकलो नाही तर राजकारणातून संन्यास घेईन’ असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या वक्तव्यावरून फडणवीस यांना चिमटे काढले आहेत. फडणवीस यांना संन्यास घेऊ देणार नाही, असे शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या मुद्द्यावर शनिवारी भाजपनं राज्यभर आंदोलन केली. फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नागपुरातील व्हरायटी चौकात आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना फडणवीसांनी ओबीसी आरक्षण रद्द होण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरलं होतं. हे आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. सत्ता मिळाल्यास आरक्षण मिळवून देईन आणि ते देता न आल्यास राजकारण सोडेन, अशी गर्जना त्यांनी केली होती. त्यावर राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
‘फडणवीस यांनी अशा प्रकारची विरक्तीची भाषा करणं योग्य नाही. आम्ही तसं होऊ देणार नाही. उत्तम नेतृत्व देऊ शकणाऱ्या नेत्यांची देशात आणि राज्यात कमतरता आहे. फडणवीस हे चांगल्या नेत्यांपैकी एक आहेत. लढवय्ये आहेत. ते त्यांच्या मुद्द्यासाठी लढत राहतील. त्यांनी संन्यास घेतला तर भाजपचं आणि जनतेचंही मोठं नुकसान होईल. त्यामुळं त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचं मन वळवायला हवं. आम्ही स्वत: त्यांची भेट घेऊ. त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करू,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखातूनही फडणवीसांच्या या घोषणेवर भाष्य करण्यात आलंय. ‘फडणवीसांनी असा त्रागा करणं योग्य नाही. संन्यास घेतील त्यांचे शत्रू,’ असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
दरम्यान, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही याच मुद्द्यावरून फडणवीसांवर टीका केली आहे. ‘सत्तेसाठी काहीही बोलायचं ही भाजपची पूर्वीपासूनची पद्धत आहे. विदर्भ स्वतंत्र होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असंही फडणवीस म्हणाले होते. मात्र, त्यानंतर काय झालं हे सर्वांनी पाहिलं. त्यामुळं त्यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!