अहमदनगर – नेवासा तालुक्यात एक क्रांतिकारी घटना घडली आहे. काही लोकांना ही घटना अजब वाटेल. परंतु मोटे कुटुंबाने घेतलेला निर्णय खरच समाज परिवर्तन करणारा आहे. नेमके कोणत्या कारणाने त्यांनी हा विवाह केला हे जाणून घेणं गरजेचं आहे.
भाऊबंद,गावकरी व समाज काय म्हणेल याचा विचार न करता वडाळा बहिरोबा(ता.नेवासे) येथे नुकताच विधवा भावजयीबरोबर लहान दीराचा विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला.उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत करुन नवदांपत्यास शुभ आशिर्वाद दिले.
सास-यांनी प्रकाशाची वाट निर्माण करुन देत कुटुंबाच्या घराचं घरपण संभाळले आहे. नात्याने दीर-भावजयीच्या या विवाह सोहळ्यात उपस्थितांनी ऊभे राहून टाळ्यांच्या गजरात या विधायक उपक्रमाचे स्वागत करत नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या.सामाजिक कार्यकर्ते चांगदेव मोटे यांची मध्यस्थी यशस्वी झाली.
संजय मोटे यांचा अभियंता असलेला मोठा मुलगा महेशचे दोन वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले.त्याची पत्नी प्राजंली सात महिन्याच्या बाळासह पोरकी झाली.प्राजंलीचे वडील बाळासाहेब गव्हाणे (राहुरीफॅक्टरी)निःशब्द झाले होते.आता मुलीचं कसं होणार या चिंतेत ते होते.सासरे संजय मोटे यांनी वडीलकीची भुमिका करत विधवा सुनेचा विवाह लहान मुलगा अभियंता महेंद्र बरोबर निश्चित केला होता.आज हा अगळावेगळा विवाह संपन्न केला आहे.