पालघर : योगेश चांदेकर – डहाणू तालुक्यातील तवा ग्रामपंचायत हद्दीत आदिवासी वस्ती सुधारणा योजनेचा निधी मुंबईच्या धनाढ्य फार्म हाऊस च्या मालकाच्या दिमतीला लावल्याचे वृत्त लक्षवेधी न्युजने लावल्यानंतर त्याची दखल डहाणू आदिवासी प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल यांनी तातडीने घेतली असून, त्यांनी ग्रामपंचायतीस कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच, या कामात भ्रष्टाचार व अनियमितपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन लक्षवेधी न्यूजला दिले आहे. त्यांच्या या धडक कारवाईमुळे अवैध आणि अनियमित काम करणारे घोटाळेबाज चांगलेच धास्तावले आहेत.
काय आहे प्रकरण :
महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजने अंतर्गत तालुक्यातील तवा या गावातील आदिवासी पाड्यासाठी आलेल्या निधीचा अनियमित व गैरवापर झाल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी प्रकल्प विभागाने लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली होती. आदिवासी वस्ती सुधारणा योजनेचा निधी मुंबईतील धनदांडग्या फार्म हाऊस मालकाच्या दिमतीला लावल्याने सामाजिक स्तरातवर विरोधाचा सूर उमटला होता. योजनेअंतर्गत पुलाच्या बांधकामासाठी 13.02 लाख रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र हा निधी संबंधित अधिकाऱ्यांने आदिवासी विकास वस्त्यांसाठी खर्च न करता दुसरीकडे फार्म हाऊसकडे जाणाऱ्या पुलासाठी खर्च केला आहे. ज्या ठिकाणी हा पूल तयार करण्यात आला, त्याच्या समोरून जाणारा रस्ता जमीन मालकाने तार कंपाउंड करून पूर्णपणे बंद केला आहे. अगदी पायी जाण्यासाठी थोडीशीही जागा सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे हा निधी आदिवासींच्या लाभासाठी नसून फार्म हाऊसच्या धनाढ्य मालकासाठी असल्याने समजते. याबाबत लक्षवेधी न्युजने वृत्त प्रकाशित केले होते, त्याची दखल घेत मित्तल यांनी ही कारवाई केली आहे.
प्रतिक्रिया :
“याप्रकरणी संबंधित ग्रामपंचायतीला कारणे दाखवा नोटीस बजावली असून दोषींवर कारवाई करण्यात येईल.” अशी प्रतिक्रिया आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प डहाणूच्या अधिकारी, आशिमा मित्तल यांनी दिली आहे.
















