नवी दिल्ली ः देशातील प्रभावी व्यक्तिमत्त्वापैकी एक असलेल्या म्हणजे सोनिया गांधी. त्या परदेशी वंशाच्या आहेत, हेही भारतीय लोक विसरून गेले आहेत. त्यांच्या विदेशी असण्याचा मुद्दाही मागे पडला आहे. त्यांनी राजीव गांधी यांच्यासोबत कसे लग्न केले हे पाहणे मनोरंजक आहे. अर्थातच त्यांचे लग्न लव्हमॅरेज आहे.
सोनिया गांधी 7 जानेवारी 1965 साली कँब्रिजमध्ये आल्या. त्यांनी येथील एका स्कूलमध्ये अॅडमिशन घेतले आणि तेथेच एका प्लॅटमध्ये त्या राहू लागल्या. येथील जेवण त्यांना चांगले वाटले नाही, सुरुवातीला त्यांना इंग्रजी बोलतानाही अडचण येत होती. काही दिवसानंतर त्यांना जवळच एक ग्रीक हॉटेल सापडले. या हॉटेलचे नाव होतं वर्सिटी. राजीव गांधीही आपल्या मित्रांसोबत याठिकाणी यायचे.
याच हॉटेलमध्ये सोनियांनी पहिल्यांदा राजीव यांना पाहिलं होतं. राजीव शांत आणि सुंदर होते. तसेच ते विनम्रही होते. जेव्हा सोनिया गांधी याठिकाणी लंच करत होत्या त्यावेळी त्यांचा एका कॉमन मित्र क्रिस्टियन वॉन स्टीगलिज यांच्यासोबत राजीव तेथे आले. त्याचवेळी सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांचा परिचय झाला.
”सोनिया गांधी- एक्स्ट्राऑर्डिनरी लाईफ, अँड इंडियन डेस्टिनी” sonia gandhi an extraordinary life an indian destiny या पुस्तकात म्हणण्यात आलंय की सोनिया यांना पहिल्याच नजरेत राजीव यांच्यासोबत प्रेम झाले. राजीव गांधींसोबतही असंच घडलं
पहिल्या भेटीनंतर राजीव आणि सोनियांची मैत्री झाली. त्यांची मैत्री हळूहळू घट्ट होऊ लागली. राजीव गांधी आपली आई इंदिरा गांधी यांना पत्र लिहायचे. यावेळी पत्रात ते सोनिया गांधींचा उल्लेख करायचे. राजीव गांधी आपल्या लाल रंगाच्या वॉक्सवेगन कारमधून दररोज सोनिया गांधींना भेटायला जायचे. राजीव गांधी त्यावेळी एका बेकरीमध्ये पार्ट टाईम काम करायचे.
राजीव गांधी यांनी इंदिरा गांधींसमोर सोनिया यांच्याबाबत वाटणाऱ्या भावना व्यक्त केल्या होत्या. राजीव गांधी यांनी इंदिरा आणि सोनिया यांची भेट लंडनमध्ये घडवून आणली. पण, सोनिया यांच्या घरच्यांना हे संबंध मान्य नव्हते. असे असले तरी सोनिया आणि राजीव यांनी आयुष्य सोबत घालवण्याचा पक्का इरादा केला होता.
1966 मध्ये सोनिया इटलीला परत गेल्या. त्यानंतर राजीव गांधींनी इटलीमध्ये जाऊन सोनिया यांच्या घरच्यांची भेट घेतली. त्यानंतर सोनिया यांच्या वडिलांनी त्यांच्यासमोर एक अट ठेवली. एक वर्षांपर्यंत त्यांना लग्न न करण्यास सांगितलं आणि या काळात त्यांच्यातील प्रेम कायम राहिले, तर ते लग्नाला होकार देतील, असं वडिलांनी म्हटलं.
सोनिया गांधी एक वर्ष इटलीमध्ये राहिल्या, पण या काळात त्या राजीव यांना विसरु शकल्या नाहीत. 13 जानेवारी 1968 साली त्या दिल्ली एअरपोर्टवर उतरल्या. त्यांना घेण्यासाठी राजीव गांधी आपले बंधू संजय यांच्यासोबत आले होते. सोनिया गांधी अमिताभ बच्चन यांच्या घरी थांबल्या होत्या. त्यानंतर त्यांचे लग्न झाले.