पालघर जिल्ह्यात होणार राजकीय भूकंप !
पालघर : योगेश चांदेकर – देशाची राजकीय प्रयोगशाळा म्हणून पुढे येणाऱ्या पालघर जिल्यातील नवे नवे राजकीय प्रयोग महाराष्ट्रासह देशाला परिचित आहेत. त्यामुळे येथे पुन्हा नव्या राजकीय हालचालींना वेग आला असून येत्या काही दिवसात मोठा राजकिय भूकंप येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यातून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सत्तेत आपला वाटा बळकावण्यासाठी मित्रपक्षांतच कुरघोडी वाढली आहे. अंतर्गत गटबाजीमुळे आणि वैयक्तिक लालसेपोटी या तिन्ही पक्षांना जोरदार झटके बसणार हे नक्की.
पालघर जिल्ह्यातील दोन पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच पक्ष संपवण्याची सुपारी घेतली असून त्यामुळे पक्ष वाढवणे ही संकल्पना लांबच असून पक्षात फुटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील भाई-भाई स्वतः ला राजकारणातील किंगमेकर समजत असून या भाईंना जिल्हा म्हणजे स्वतःची जहागीरी असल्याचे वाटत आहे. अशा भाईंनी आपले उद्योग सोडून खुशाल राजकारणात प्रवेश करावा. तेव्हा त्यांना कळेल की किंगमेकर काय संकल्पना आहे.
पालघरच्या जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी लवकरच राजीनामा देणार असून दुसऱ्या व्यक्तीची जिल्हा परिषद अध्यक्षपदी वर्णी लागण्याची दाठ शक्यता आहे. जिल्हापरिषदेच्या या राजीनामा सत्राला एक वेगळेच वळण लागणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात नवा राजकीय भूकंप होणार आहे?
दोन पक्षाचे जिल्हाप्रमुख पक्ष वाढू देणार नाही. हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ शकतो आणि या पक्षाची मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे एकंदरीतच पक्ष संपवण्याची सुपारीच या नेत्यांनी घेतली आहे का? असा संभ्रम निर्माण झाला असून निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झाले आहे.’पक्ष मी सांगेल तसा चालणार’ ही पक्ष प्रमुखांची भूमिका असल्याने ‘ हे ‘ स्वतःला पक्षापेक्षा मोठे समजू लागल्याची चर्चा आहे. पक्षातील इतर महत्त्वाचे नेते सदरील पक्षात काहीही स्थान नाही हे दाखविण्याचे प्रयत्न करत आहे.
जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारमधील दोन-तीन नेत्यांमध्ये एक चौकडी निर्माण झाली असून, त्यांच्या माध्यमातून पक्ष चालवण्याचा काम चालू आहे. मात्र या दोन्ही पक्षातील नेते मंडळी पक्षविस्तार करत नसल्याने स्थानिक पक्ष नेतृत्वाला मोठा धक्का बसणार आहे. निलेश सांबरे हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद रद्द झाल्याने त्यांना या पदापासून मुकावे लागले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेचा आतापर्यंतचा काळ मोठ्या प्रमाणात वादग्रस्त होता.
सत्तास्थापणासाठी या तिन्ही पक्षात मतमतांतरे निर्माण झाली असून, बहुमतासाठी लागणाऱ्या सदस्यांची संख्या उपलब्ध नसल्याने आणि पक्ष फुटी झाल्याने दोन गट निर्माण झाले आहे. त्यामध्ये या तीन चाकाच्या सरकारमधील दोन प्रमुख आणि विरोधात असलेले भाजप यांचा एक प्रबळ गट निर्माण झाला असून, महाविकास आघाडीतील एका पक्षाला आता हे नव्याने एकत्र येणारे पक्ष घरचा आहेर देणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी होणार असून, मोठं राजकीय संकट निर्माण होणार आहे. मात्र यात महाविकास आघाडीमधील दोन पक्षाचं भलं होणार असून, आता पुन्हा स्थानिक पातळीवर एक नवीन आघाडी निर्माण होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज्यातील तीन पक्षाचं महाविकास आघाडी सरकार दररोज नवनवीन मुद्द्यांवर एकमेकांच्या विरोधात उभे राहत आहे. अनेक विषय वाद होत आहेत तर काही विषय पेल्यातील वादळाची चर्चा ठरत आहे. पण आता महाविकास आघाडीत पुन्हा एकदा नव्याने वाद होण्याची शक्यता निर्माण झालीये. जिल्ह्यातील राजकारणात आपापले सुभे शाबूत ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना सोपे नाही. पक्षाच्या ज्येष्ठ नेतृत्वाला अंधारात ठेऊन विचारधारेच्या विरोधात काम करणाऱ्या स्थानिक पक्ष प्रमुखांमुळे कार्यकर्त्यांमध्येही नाराजी दिसून येते.त्यांच्या नाराजीचा फटका भविष्यात त्या त्या पक्षांना होऊ शकतो, असा अंदाज राजकीय अभ्यासकांना आहे.