पालघर-योगेश चांदेकर
पालघर-डहाणू तालुक्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतींच्या अजब कारभाराचे एक-एक नमुने समोर येत आहेत. वाघाडी ग्रामपंचायतीनंतर आता रायपूर ग्रामपंचायतीचा कारभार अजब समोर आला आहे. अर्जित रजा संपल्यानंतर केवळ कार्यालयीन वेळेत हजर झालेला ग्रामविकास अधिकारी अजूनही पदभार स्वीकारण्यास ला तयार नाही, तर दुसरा ग्रामविकास अधिकारी पदभार सोडायला तयार नाही. त्यामुळे या गावात सात महिन्यांपासून दोन ग्रामसेवक कार्यरत असून, एक ग्रामसेवक तर कामाविनाच पगार घेत आहे.
रायपूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक वसंत कृष्णा गायकवाड ३० ऑक्टोबर २०२३ ते ३० जानेवारी २०२४ पर्यंत अर्जित रजेवर होते. ही रजा संपल्यानंतर ३१ जानेवारी २०२४ रोजी त्यांनी ग्रामपंचायतीचा पदभार घेणे आवश्यक होते. त्यानुसार ते कार्यालयात हजरही झाले. परंतु, त्यांच्या गैरहजेरीच्या काळात चंदू डोंगरकर यांच्याकडे ग्रामविकास अधिकारीपदाचा तात्पुरता कार्यभार देण्यात आला होता.
दोघांचेही वर्तन बेजबाबदारपणाचे!
रजेवरून परतलेले ग्रामविकास अधिकारी गायकवाड यांना डोंगरकर यांनी पदभार सोपवायला हवा होता. परंतु, त्यांनी तसे केले नाही. तर गायकवाड यांनीही याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना कळविणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनीही याबाबत गांभीर्य दाखविले नाही. त्यामुळे तात्पुरता पदभार असलेले ग्रामविकास अधिकारी डोंगरकर हेच कार्यालयीन कामकाज पाहत असून, गायकवाड मात्र अर्जित रजा संपून सहा महिने उलटूनही कामाविनाच पगार घेत आहे.
पदभार न घेतल्यास कारवाई
गेल्या सहा महिन्यापासून पंचायत समिती याबाबत काय करत होती, याचे उत्तर मिळत नाही. आता मात्र गटविकास अधिकारी हेमंत गरिबे यांनी ग्रामविकास अधिकारी वसंत गायकवाड यांना पत्र पाठवून अर्जित रजा संपल्यानंतर ग्रामपंचायतीचा कार्यभार घेतला नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून दिली आहे. १जुलै २०२४ या तारखेला रायपूर ग्रामपंचायतीचा पदभार हाती घेऊन तसा लेखी अहवाल कार्यालयास सादर करावा. अन्यथा ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणली जाईल, तसेच जिल्हा परिषद अधिनियम १९६४ च्या कलम चार अन्वये कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद दिली आहे.
पदभार न सोडणाऱ्यालाही ताकीद
तात्पुरता पदभार असलेले ग्रामविकास अधिकारी चंदू डोंगरकर यांनाही गरिबे यांनी सक्त ताकीद दिली आहे. गायकवाड रजेवरून परतल्यानंतर त्यांना संपूर्ण कार्यभार ताब्यात देणे आवश्यक असतानाही तसे केले नाही, ही गंभीर बाब आहे. १ जुलै २०२४ पर्यंत ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार गायकवाड यांच्याकडे देण्यात यावा असे आदेश गरिबे यांनी दिले आहेत. त्यासंबंधीचा कार्यपूर्ती अहवालही पंचायत समितीकडे सादर करण्यास सांगितले आहे.
पदभार न सोडण्यामागे गैरकारभार?
मागील सहा महिन्यांपासून डोंगरकर हे ग्रामपंचायतीचा कार्यभार का सोडत नाहीत, त्यांच्या काळात त्यांनी काही गैरप्रकार केले का आणि ते निस्तरण्यासाठी ते येथे थांबले आहेत का, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यांच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. सहा महिने गायकवाड कामाविनाच पगार का घेत होते, त्यांनी डोंगरकर पदभार देत नाहीत? तसेच याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना अहवाल
का दिला नाही? रायपूर ग्रामपंचायत तसेच डहाणू पंचायत समितीही याबाबत सहा महिने काय करत होती? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. या प्रकरणामुळे या दोन्ही पंचायतराज संस्था संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.