पालघर-योगेश चांदेकर
रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची सवरा यांना माहिती
पालघरः लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवनिर्वाचित खा. डॉ. हेमंत सवरा यांनी मुंबई आणि पालघर परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांकडे रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांचे लक्ष वेधले. त्याचबरोबर या भागासाठी कोणकोणत्या योजना प्रस्तावित आहेत याची माहिती त्यांनी विचारली.
वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईपासून पालघरपर्यंतच्या उपनगरीय, हार्बर तसेच रेल्वेच्या विविध प्रकल्पांसाठी सुमारे पन्नास हजार कोटी रुपये खर्चाचे विविध प्रस्ताव मंजूर झाले आहेत, तर काही प्रस्ताव विचाराधीन आहेत. डॉ.हेमंत सवरा पहिल्यांदाच लोकसभेत निवडून आले आहेत. वसई, विरार, मीरा, भाईंदर या परिसरातील तसेच पालघर विभागातील रेल्वेच्या प्रवाशांच्या अडचणी त्यांनी सभागृहात उपस्थित केल्या आणि या भागातील रेल्वे प्रवाशांची सोय होण्यासाठी तसेच कमी वेळेत चांगला प्रवास करण्यासाठी केंद्र सरकार कोणकोणत्या योजना राबवीत आहेत, कोणत्या योजना विचाराधीन आहे, कोणत्या प्रकल्पाची कामे सुरू आहेत याबाबत त्यांनी रेल्वे मंत्रालयाला विचारणा केली.
विविध कॉरिडॉर आणि जादा लाईन
मुंबई सब अर्बन कॉरिडॉर, मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टसाठी किती किती रक्कम मंजूर झाली अशी विचारणा डॉ. सावरा यांनी केली असता रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी दिलेल्या लेखी उत्तरानुसार मुंबई सबअर्बन कॉरिडॉर अंतर्गत मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी)दोनसाठी ८०८७ कोटी ‘एमयूटीपी’ तीनसाठी दहा हजार ९४७ कोटी रुपये, तर ‘एमयूटीपी’ ३ ए साठी ३३ हजार ६९० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
असे आहेत प्रकल्प
वसई ते दिवा मार्ग अगोदरच अस्तित्वात आहे. नायगाव ते जुचंद्रा हा ५.७३ किलोमीटरचा मार्ग मंजूर असून त्यासाठी १७५ कोटी ९९ लाख रुपये मंजूर आहेत. याशिवाय तीन कॉरिडॉरसाठी मागणी असून त्या विचाराधीन असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान ३० किलोमीटरचा सहावा मार्ग (९१९ कोटी), हार्बर लाइन गोरेगाव ते बोरिवली सात किलोमीटर (८२६ कोटी), विरार-डहाणू रोड तिसरी आणि चौथी लाईन ६४ किलोमीटर (३५८७ कोटी रुपये), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला साडे सतरा किलोमीटर पाचवी आणि सहावी लाईन (८९१ कोटी रुपये), पनवेल-कर्जत लाईन(२७८२ कोटी रुपये), ऐरोली-कळवा सबअर्बन कॉरिडॉर ३.३ किलोमीटर (४७६ कोटी रुपये), बोरिवली ते विरार २६ किलोमीटरची पाचवी व सहावी लाईन (२१८४ कोटी रुपये), कल्याण-आसनगाव दरम्यान ३२ किलोमीटरची चौथी लाईन (१७५९ कोटी रुपये), कल्याण-बदलापूर दरम्यान १४.५ किलोमीटरची तिसरी आणि चौथी लाईन (पंधराशे दहा कोटी रुपये) आणि कल्याण यार्डमधील मेन लाईन (८६६ कोटी रुपये) अशी तरतूद करण्यात आल्याची माहिती वैष्णव यांनी डॉ. हेमंत सवरा यांना दिली आहे.