औरंगाबादेत मुलीला आईने पैसे न दिल्याने मुलीने आत्महत्येचं पाऊल उचललं
औरंगाबाद: सलमान शेख- आईने दहा रुपये न दिल्याने 13 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेतील हडको एन 13 परिसरातील वानखेडे नगर येथे रविवारी रात्री उशिरा घडली. मोहिणी असे मृत मुलीचे नाव असून, तिचे वडील बांधकाम मिस्तरी आहे. तर तिची आई लोकांच्या घरी धुणी-भांडी करून कुटुंबाचा उदर निर्वाह भागवते.
मोहिणीने आपल्या आईला 10 रुपये मागितले होते. परंतु पैसे सुट्टे नाहीत, उद्या देते असे कारण तिच्या आईने सांगितले. अशातच रागाच्या भरात मोहिणीने शेजारच्या खोलीत जाऊन पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर आईने खोलीत बघितल्यावर आरडाओरड सुरू केला.
आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत मोहिणीला तात्काळ खाजगी रुग्णालयात नेले मात्र; त्यांना घाटी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांनी तिला तपासून रविवारी रात्री 11 वाजता मृत घोषित केले. सदरील घटनेची नोंद बेगमपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहे.