वाडा तालुक्यातील सापणे या गावातील एका महिलेची रात्रीच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली असून चोरट्याने चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश करून महिलेची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्याचे काम वाडा पोलीस करीत आहेत.
सुप्रिया गुरुनाथ काळे, वय 45 ही महिला आपल्या कुटुंबासह सापणे खुर्द गावात राहत असून पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार सुप्रिया काळे यांची मुले इतर खोल्यांमध्ये व सुप्रिया या हॉल मध्ये झोपल्या होत्या तर त्यांचे पती हे बाहेर ओसरीवर झोपले होते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घराच्या मागच्या खिडकीतून घरात प्रवेश केला व हॉल मध्ये झोपलेल्या सुप्रिया यांच्यासोबत त्याची झटापट झाली. यावेळी चोरट्याने सुप्रिया यांच्या गळ्यावर व कानावर अज्ञात हत्याराने वार करून त्यांची हत्या केली व त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील कुडी व मोबाईल असे एकूण ६२ हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोर पसार झाला आहे.
याबाबत वाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोकण विभागीय उप महानिरीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, यांच्यासह पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत परदेशी घटनास्थळी उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर संखे अधिक तपास करत आहेत.