पालघर-योगेश चांदेकर
पूर्वसूचना, नोटिसा न देता कारवाई डहाणूच्या मुख्याधिकारी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप
पालघरः रस्त्याच्या रूंदीकरणात येणारी अतिक्रमणे हटवल्याच्या विरोधात आ. विनोद निकोले रस्त्यावर उतरले असून, नुकसान भरपाई आणि पुनर्वसन झाल्याशिवाय डहाणूतील रस्त्याचे रुंदीकरण होऊ न देण्याचा इशारा आ. विनोद निकोले यांनी दिला आहे.
डहाणूतील दुकाने, व्यापारी संकुलातील गाळे आणि झोपडपट्ट्या तोडण्याचे कारवाई डहाणू नगरपालिकेने केली असून त्या विरोधात आ. निकोले यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. यापूर्वी चर्चा झालेली असताना कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमणे काढण्यात आल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
दीडशे वर्षांपासून राहणाऱ्यांना केले बेघर
विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना आमदारांना माहिती न देता ही कारवाई करण्यात आल्याबद्दल आ. निकोले यांनी नाराजी व्यक्त केली. डहाणू शहरातील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी रस्त्यालगतची दुकाने, टपऱ्या, व्यापारी संकुले तसेच काही पक्की घरेही पाडण्यात आली. त्या संदर्भात कोणालाही नोटिसा किंवा पूर्वसचना देण्यात आली नव्हती, असा आरोप आ. निकोले यांनी केला. डहाणूतील काही लोक शंभर दीडशे वर्षांपासून या घरात राहत आहेत. त्यांच्या नावावर वीजबिले, तसेच घरपट्टी आहेत. असे असताना त्यांना डहाणू नगरपालिकेने कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न पाठवता त्यांची पक्की बांधकामे उद्ध्वस्त केली.
मुख्याधिकाऱ्यांची बेपर्वा वृत्ती
डहाणू नगरपालिकेने मुख्याधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अतिशय बेपर्वाईने वागले असून याप्रकरणी त्यांनी आमदारांनाही विश्वासात घेतले नाही. आमदाराच्या सूचनांनाही डावलले. हा हक्कभंग आहे. याप्रकरणी आपण मुंबईच्या अधिवेशनात आवाज उठवणार आहोत; शिवाय सर्व गाळेधारक व्यापारी तसेच ज्यांची बांधकामे पाडली, ते नागरिक यांची एक सर्वसमावेशक बैठक घेऊन त्यांच्या पुनर्वसनाचा तसेच त्यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न त्यात मांडला जाईल. त्याबाबत नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची काय भूमिका आहे ती जाणून घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.यावेळी माकपचे चंद्रकांत घोरखना चेतन माढा,धनेश आक्रे, तसेच शमी पीरा संजय पाटील आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संबंधितांवर कारवाईचा आग्रह
संबंधितांवर कारवाई करण्याबाबत आपण वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करू, असे सांगून जोपर्यंत पुनर्वसन आणि नुकसान भरपाईबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत डहाणूतील रस्त्यांचे रुंदीकरण होऊ देणार नाही, असा इशारा आ. निकोले यांनी दिला. डहाणू आणि तलासरी तालुक्यातील जनता या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संबंधितांना जाब विचारेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.