पालघर– मोखाडा तालुक्यातील घाणवळ परिसरातील दोन महिन्यांच्या बालकाचा लसीकरणानंतर मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर आरोग्य विभागाने संबंधित लसीच्या वापराबाबत खबरदारीची भूमिका घेतली आहे. या प्रकरणी लसीकरणाचा काही संबंध आहे का, याबाबत पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, संबंधित लसीचा वापर तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, घाणवळ परिसरातील दोन महिन्यांच्या बालकाला नियमित लसीकरणासाठी जव्हार येथील कुटीर रुग्णालयात नेण्यात आले होते. लसीकरणानंतर बालकाची प्रकृती खालावल्याने त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान बालकाचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर कुटुंबीयांनी संबंधित लसीबाबत शंका व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित लसीचा वापर तात्पुरता बंद करण्यात आला असून, प्रकरणाची माहिती वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे.
दरम्यान, याच लसीचा डोस आणखी २४ बालकांना देण्यात आल्याची माहिती समोर आली असून, प्रथमदर्शनी या मृत्यूचा थेट संबंध लसीकरणाशी असल्याचे दिसून येत नाही. मात्र, नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी सखोल चौकशी व वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यूचे नेमके कारण तपासणी अहवालानंतर स्पष्ट होईल, असे सांगितले आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी केले.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg