पालघर – योगेश चांदेकर
पालघर: अनधिकृतरित्या ‘रयतेचा कैवारी’ हे डिजिटल दैनिक चालविणारे संपादक शिक्षक शाहू भारती यांच्या निलंबनानंतर आणखी काही शिक्षक इतर व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे. या मुद्द्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. याच अनुषंगाने मनसेने पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले. शिक्षकी पेशाव्यतिरिक्त नियमबाह्य पद्धतीने इतर व्यवसाय करणाऱ्या शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पक्षाने या निवेदनाद्वारे केली आहे.
मनसेने या निवेदनात म्हटले आहे की, नियमबाह्य पद्धतीने डिजिटल दैनिक चालविणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षकवजा संपादकांना शिक्षण विभागाने नुकतेच निलंबित केल्याचे वृत्त लक्षवेधी या डिजिटल दैनिकात वाचण्यात आले. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात नोकरी करताना विद्यार्थी हाच केंद्रबिंदू समजून शैक्षणिक कार्य करणे अपेक्षित असते. शिक्षकांना सरकारने कामे सोपविल्यास शालाबाह्य कामे नको, म्हणून मोठा विरोध होतो. मात्र, अनेक शिक्षकांचे शालाबाह्य व्यवसाय नेहमी सुरूच असतात. शिक्षकच आर्थिक लाभासाठी स्वतःला नियमबाह्य पद्धतीने इतर कामात गुंतवून घेत असतील आणि शैक्षणिक कार्याऐवजी इतर जोडधंद्यात झोकून देत असतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा काय आहे? तो सुधारत आहे की खालावत आहे? या शाळांमधील शिक्षण, तेथील सुविधा, विद्यार्थी संख्या, त्यांची गुणवत्ता व आवश्यक सुधारणा यावर अभावानेच चर्चा होते, तर चर्चा केवळ शिक्षकांचीच होत असते, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शिक्षण विभागाचे याकडे लक्षच नाही किंवा त्यांना पाठीशी घातले जाते का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. ही बाब चिंताजनक आणि संतापजनक आहे. या प्रकारामुळे आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याची आणि गुणवत्तेची जटील समस्या निर्माण झाली आहे. याला नियंत्रण सुटलेली यंत्रणाच सर्वस्वी जबाबदार आहे, कारण ज्या उद्देशाने शासनाने शाळा सुरू केल्या, त्यालाच शिक्षक आणि प्रशासनाकडून हरताळ फासला जात आहे, असा आरोपही मनसेने या निवेदनाद्वारे केला आहे.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करून इतर कामे करणे याला काय म्हणावे? नोकरी करताना इतर कामे करण्यासाठी आपल्या विभागाची परवानगी घेणे गरजेचे आहे का? अशी परवानगी आपण देता का? किती शिक्षकांना आपण अशी परवानगी दिली? शासनाच्या कोणत्या नियमानुसार दिली? परवानगी दिली नसेल तर अशाप्रकारे काम करणाऱ्या शिक्षकांची माहिती आपल्याकडे आहे का? असे प्रश्नही मनसेने या निवेदनाद्वारे उपस्थित केले आहेत. अशा शिक्षकांची माहिती असल्यास त्यांची यादी प्रसिद्ध करावी. त्यांना समज देऊन, कायदेशीर कारवाई करावी आणि कारवाईचा अहवाल जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रसिद्ध करावा, अशी मागणीही मनसेने केली आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितापुढे कोणतीही तडजोड महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करणार नाही, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. शिक्षकी पेशाव्यतिरिक्त नियमबाह्यरित्या इतर व्यवसाय करणाऱ्या शिक्षकांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मनसेने या निवेदनाद्वारे केली आहे. मनसेचे पालघर जिल्हा सचिव दिनेश गवई, शहराध्यक्ष सुनील राऊत, शहर सचिव शैलेश हरमळकर आणि शहर उपाध्यक्ष शिवा यादव यांनी हे निवेदन दिले आहे.
विविध संघटना ‘रान पेटवणार’
शैक्षणिक कार्यासोबतच इतर व्यवसाय करणाऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन जिल्ह्यातील विविध संघटनांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. या शिक्षकांसोबतच शासनाच्या इतर विभागांमधील अशा कर्मचाऱ्यांचीही तपासणी व चौकशी करून कारवाई करावी, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधणार असल्याची माहिती संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच अशा शिक्षकांमुळे शैक्षणिक क्षेत्राची बदनामी होत असल्याने इतर शिक्षकांकडूनही नाराजी व्यक्त होत आहे.

















