यांगून – म्यानमारमध्ये सोमवारी पहाटे लष्करी उठाव झाला असून अघोषित नेत्या आँग सान स्यू की यांच्यासह अध्यक्ष वीन म्यिंत यांना डांबून ठेवण्यात आले आहे. एक वर्षासाठी आणीबाणीही जाहीर करण्यात आली.
७५ वर्षीय स्यू की यांच्या नॅशनल लीग ऑफ डेमॉक्रसी (एनएलडी) पक्षाचे प्रवक्ते म्यो न्यूंत यांनी एएफपी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार सार्वत्रिक निवडणुकीनंतर संसदेचे पहिले अधिवेशन सुरु होण्यास काही तास बाकी असतानाच ही घडामोड घडली. लष्कराकडून त्यांच्या दूरचित्रवाणी वाहिनीवर ही घोषणा करण्यात आली.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या. त्यात स्यू की यांच्या एनएलडी पक्षाची सहज सरशी झाली, मात्र निवडणूकीत भ्रष्टाचार आणि मतदानात गैरप्रकार झाल्याचा आरोप लष्कराकडून करण्यात आला. त्यामुळे लष्कर आणि सरकार यांच्यात तणाव निर्माण झाला होता.
गैरप्रकाराच्या दाव्याचे निराकरण करण्यासाठी सत्ता ताब्यात घेण्याचा इशारा लष्करातर्फे गेल्याच आठवड्यात देण्यात आला होता.
तणाव
– आर्थिक राजधानी यांगूनमधील सिटी हॉलवर सैनिकांचा कब्जा
– कॅरेन राज्याचे मुख्यमंत्री, अनेक विभागीय मंत्री ताब्यात
– प्रमुख नेत्यांच्या अटकेनंतर संपर्क यंत्रणेवर निर्बंध
– अनेक मोबाईल नेटवर्क डाऊन
– राजधानी न्यापीताव येथील अनेक दूरध्वनी क्रमांक बंद
निवडणकीत भ्रष्टचार झाल्याची एक कोटी प्रकार शोधून काढल्याचा दावा लष्कराकडून करण्यात आला होता. निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यापासून कित्येक आठवडे लष्कराचे अधिकारी तशा तक्रारी करीत होते. पडताळणीसाठी सरकारी निवडणूक आयोगाने मतदार यादी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली होती, पण त्यास आयोगाने प्रतिसाद दिला नव्हता.
लष्करप्रमुखांचा इशारा
म्यानमारमधील सर्वाधिक शक्तीशाली व्यक्ती असा उल्लेख केले जाणारे लष्करप्रमुख मीन आँग हीलैंग यांनी गेल्या आठवड्यात २००८ मधील घटना रद्द केली जाईल असा इशारा दिला होता. त्याचा संयुक्त राष्ट्रे (यूएन) आणि अनेक देशांच्या परदेशी वकीलातींकडून निषेध करण्यात आला होता.