पालघर-योगेश चांदेकर
प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती
पालघरः डहाणू जनता को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक नऊ वर्षानंतर प्रथमच होत आहे. या निवडणुकीत आम्ही केलेल्या कामावर सभासदांकडे मत मागत आहोत. सकारात्मक पद्धतीने निवडणुकीला सामोरे जात असून या निवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे, असा दावा डहाणू विकास आघाडी पॅनेलचे उमेदवार आणि बँकेचे अध्यक्ष मिहीर शहा यांनी केला.
गेल्या दहा वर्षात बँकेत झालेल्या विविध विका*स कामांचा आढावा घेऊन बँकेच्या कामकाजात राजकारण न आणता आर्थिक संस्था म्हणून बँकेकडे पाहण्याची आवश्यकता आहे, या भूमिकेतूनच भरत राजपूत, आनंदभाई ठाकूर आणि आम्ही एकत्र आलो आहोत. निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा होती; परंतु लोकशाहीत सर्वांना उभे राहण्याचा अधिकार आहे. मत मागण्याचा अधिकार आहे. त्यांचा हा अधिकार मान्य करून त्यांनी उमेदवार उभे केल्यानंतर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. बिनविरोध निवडणूक न झाल्यामुळे बँकेचा १६-१७ लाखांचा खर्च वाचला असता असे त्यांनी सांगितले.
विरोधकांना सर्व जागांवर उमेदवार देण्यात अपयश
विरोधी जनता प्रगती पॅनेलला सर्व जागांवर उमेदवार उभे करता आले नाहीत, अशी टीका शहा यांनी विरोधी जनता प्रगती पॅनलच्या नेत्यांवर केली. ते म्हणाले, की आम्ही डहाणू जनता बँकेच्या माध्यमातून काय कामे केली, हे जनतेसमोर आहे. डहाणूचे या बँकेचे कार्पोरेट कार्यालय तसेच अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण शून्यावर आणणे अशा कामातून जनतेला बँकेची प्रगती दिसते आहे. सभासदांना ही प्रगती ज्ञात आहे. त्यामुळे आम्हाला नव्याने काही सांगण्याची आवश्यकता नाही. तलासरीपासून वसईपर्यंत सागरी तसेच नागरी भागात बँकेचे सभासद मोठ्या प्रमाणात राहत असून त्यांच्यापर्यंत व्यक्तीशः पोचण्यावर डहाणू विकास आघाडीच्या पॅनलने भर दिला आहे. त्यासाठी आम्ही वेगवेगळे गट तयार करून सभासदांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रगतीची त्रिसूत्री
डहाणू जनता को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रगतीत आणखी भर घालायची असेल तर डहाणू विकास आघाडी हा एकमेव पर्याय आहे आणि सभासद या पर्यायाला केवळ सकारात्मक प्रचार आणि केलेल्या कामावर प्रतिसाद देतील, असा विश्वास व्यक्त करून शहा म्हणाले, की राजकीय पक्ष वेगळे आणि बँक वेगळी. त्यामुळे सध्या कोण कुठे आहे याच्यापेक्षा बँकेच्या दृष्टीने आम्ही एकत्र आलो आहोत, सर्वसामान्य सभासदांचे हीत लक्षात ठेवून बँकेचा कारभार करण्याचा आमचा मानस आहे. बँकेच्या ठेवीत वाढ, चांगल्या कर्जदारांची निवड, बँकेच्या खर्चात काटकसर यात त्रिसूत्रीवर आम्ही भर दिला आहे. त्याचबरोबर सभासदांना डिजिटल आणि ऑनलाइन सुविधा अधिकाधिक उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आमच्या पॅनेलमध्ये आहेत. या सर्वांच्या ज्ञानाचा उपयोग करून बँकेची अधिकाधिक प्रगती करण्याचा आमचा मानस आहे, असे ते म्हणाले.
शाखाविस्तार आणि डिजिटिल, ऑनलाईन सुविधा
बँकेच्या सध्या मर्यादित शाखा असून यापुढे शाखा विस्तार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याशिवाय कोअर बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, घरबसल्या बँकिंग सुविधा अशा अनेक सुविधा देण्यावर आमचा भर आहे. समोरच्या जनता प्रगती पॅनलमध्ये कोण आहेत, ते काय करतात याबाबत आम्हाला काहीही म्हणायचे नाही. त्यांना आमच्याविषयी काय प्रचार करायचा आहे, त्याला उत्तर आम्ही आमच्या कामातून दिले आहे. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य न करता बँकेची प्रगती आणि सभासदांचे हीत या दोनच उद्देशाने आम्ही निवडणुकीला सामोरे जात असून आमचा जाहीरनामा हाच आमचा वचननामा आहे. त्यानुसार कारभार करायला आम्ही वचनबद्ध आहोत आणि जनतेला आमची वचनबद्धता आणि तिच्याशी असलेली बांधिलकी माहीत असल्यामुळे बँकेचे सभासद अन्य कुणाच्या अपप्रचाराला बळी न पडता बँक, सभासद आणि आर्थिक हीत या त्रिसूत्रीचा विचार करून डहाणू विकास आघाडीच्या पॅनलला भरघोस मतांनी विजयी करतील, असा विश्वास मिहीर शहा यांनी व्यक्त केला.
‘डहाणू जनता को-ऑपरेटिव्ह बँक ही डहाणू परिसराची आर्थिक कामधेनू आहे. ही कामधेनू जपली पाहिजे. वाढली पाहिजे आणि ती जशी वाढेल तसा तिचा अधिकाधिक सभासदांना उपयोग झाला पाहिजे, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करीत असून आमच्या डहाणू विकास आघाडीला सभासद पूर्ण क्षमतेने आणि मोठ्या फरकाने निवडून देतील.
मिहीर शहा, अध्यक्ष डहाणू जनता को-ऑपरेटिव्ह बँक, डहाणू