पालघर-योगेश चांदेकर
आरोपीला अटक
जागेच्या वादातून सूडाने खून केल्याची कबुली
पालघरः तालुक्याच्या पूर्व भागातील दुर्गम भाग असलेल्या सावरे ग्रामपंचायत हद्दीतील बर्डे पाड्यालगतच्या डोंगरालगत असलेल्या एका ओढ्यात एक महिला आणि तिच्या दोन वर्षीय मुलीचा मृतदेह हातपाय बांधून, दगडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आले.असून या दुहेरी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी संदीप डावरे याला अटक केली आहे. जागेच्या वादातून त्याने भावजयी आणि पुतणीचा खून केल्याचे उघड झाले आहे.
सावरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुस्मिता प्रवीण डावरे (वय २८) ही तरुणी, व तिची दोन वर्षाची मुलगी पतीसोबत राहत होती. पती मच्छीमार बोटीवर काम करत असल्याने तो मच्छीमारीसाठी बाहेर गेल्याने त्याने डाव साधून संदीपने हे कृत्य केले. सुस्मिता आणि तिच्या मुलीचा एका दगडाला आणि हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
धडा शिकवण्यासाठी खून
प्रवीण आणि त्याची पत्नी सुस्मिताने जागा खाली करून दुसरीकडे जावे, असा तगादा संदीपने लावला होता; परंतु त्याला ते तयार नव्हते. सुस्मिता संदीपला जशास तसे उत्तर देत होती. त्यामुळे सुडाने पेटलेल्या संदीपने दोघींचा गळा आवळून खून केला.
जंगलात असलेल्या नाल्यात फेकले मृतदेह
सुस्मिता रात्री बाहेर आली असता तिचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर मुलीचाही गळा आवळत खून करण्यात आला. एका मागून एक दोघींना खांद्यावर उचलून जंगलात नेण्यात आले. घरापासून चार किलोमीटरवरच्या जंगलात दोघींचे मृतदेह नेऊन हातपाय बांधून, दगडाला बांधून नाल्यात फेकण्यात आले.
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
वाडा परिसरातील काही लोकांनी येथे येऊन भावजयी आणि पुतणीला उचलून नेले. ते जास्त लोक होते. हिंदीत बोलत होते. त्यामुळे आम्ही घाबरलो. विरोध न करता आम्ही लपून बसलो, असे संदीपने पोलिसांना सांगून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
संशयामुळे उकलले खुनाचे गूढ
सुस्मिता व तिच्या मुलीचा मृतदेह घरापासून चार किलोमीटर लांब जंगलात टाकण्यात आला. तिथे जायला स्थानिक लोकही घाबरतात. वाड्याच्या लोकांना येथे येऊन त्या जंगलात जाणे शक्यच नसल्याने पोलिसांची संदीपवर नजर होती. त्याची कथानके संशयास्पद वाटत होती. अखेर ‘थर्ड डिग्री’ दाखवल्याने त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्यावर मनोर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन दिवसांतील दुसरी घटना
पालघर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळले होते. आई आणि मुलीचा मृतदेह पेटीत, तर वडिलांचा मृतदेह बाथरूममध्ये आढळला. त्यांनतर ही दुसरी घटना घडली आहे.