पालघर-योगेश चांदेकर
दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनची सल्लागार म्हणून नियुक्ती
माजी खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नांना यश
पालघरः मुंबई प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत विस्तारित मुंबई शहर मेट्रोने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यापैकी काही मार्गावरील काम प्रगतिपथावर आहे. या कामाचाच एक भाग म्हणून मीरा-भाईंदर ते वसई-विरार या मेट्रो मार्गाच्या कामाबाबत आता विचारविनिमय सुरू झाला आहे. या कामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी दिल्ली मेट्रोची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई परिसरात सुमारे तीनशेहून अधिक किलोमीटरचे मेट्रो रेल्वेचे जाळे उभारले जात आहे. ३३१.१ किलोमीटरच्या या मेट्रो प्रकल्पांसाठी २१ लाख ४० हजार ८१४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि काही वित्तीय संस्थांच्या कर्जातून हे मेट्रोचे जाळे उभे राहणार आहे.
दहिसर-मीरा भाईंदर मार्ग लवकरच पूर्णत्त्वाला
दहिसर ते मीरा-भाईंदर या मेट्रो मार्गाचे काम प्रगतिपथावर असून हे काम आणखी सात-आठ महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. राजेंद्र गावित खासदार असताना त्यांनी मुंबई क्षेत्र प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या प्रमुखांना पत्र लिहून मीरा-भाईंदर ते वसई-मिरार विरार मेट्रो सुरू करण्याबाबत आग्रह धरला होता. गेल्या सात महिन्यापूर्वी पाठवलेल्या पत्राला आत्ता मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या परिवहन अभियंत्यांनी उत्तर दिले आहे.
वाढते शहरीकरण लक्षात घेऊन मेट्रो
वसई, विरार या परिसरातील होणारा विकास, वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढणारे शहरीकरण, औद्योगीकीकरण आदींचा विचार करून मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाने आता मीरा-भाईंदर ते वसई-विरार या मेट्रो मार्गाचे कामही हाती घेण्याचे ठरवले आहे. हा मेट्रोमार्ग तेरा क्रमांकाचा आहे. मीरा-भाईंदर या शहरात सध्या मेट्रो मार्गाचे स्थापत्य काम चालू असून त्याच मार्गाला हा वसई-विरार मेट्रो मार्ग जोडला जाईल. त्यासाठी दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनची सल्लागार म्हणून नियुक्ती केली असून या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे, असे परिवहन अभियंता चंद्रकांत बनसोडे यांनी गावित यांना कळवले आहे.
२३ किलोमीटरचा मार्ग, वीस स्टेशन्स
मुंबई परिसरातील शंभर किलोमीटरच्या परिघातील शहरांचा विकास लक्षात घेऊन १३ मेट्रो लाईन टाकण्यात येणार आहेत. त्यात मीरा रोड ते विरार हा २३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग असून, त्यात वीस स्टेशनचा समावेश आहे. वसई, विरारची एकूण लोकसंख्या आणि मीरा-भाईंदर, वसईचे शहरीकरण लक्षात घेऊन हा मेट्रो मार्ग हाती घेण्यात येणार आहे.
मीरा-भाईंदर मेट्रो पुढच्या वर्षी सुरू होणार
मीरा-भाईंदर मेट्रो साधारण पुढच्या वर्षी सुरू होण्याची अपेक्षा आहे, तर वसई, विरारपर्यंत ही मेट्रो येण्यासाठी आणखी किमान पाच वर्षे लागू शकतील.
‘मीरा-भाईंदर ते वसई-विरार या परिसरातील वाढते नागरिकीकरण, या भागातील वाहतुकीची कोंडी आणि परिसरातील नागरिकांना गतिमान चांगली सेवा मिळावी, यासाठी मीरा-भाईंदर ते वसई-विरार मेट्रो मार्गाचा पाठपुरावा केला. आत्ता प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.
-राजेंद्र गावित, माजी खासदार, पालघर लोकसभा मतदारसंघ.