
पालघर-योगेश चांदेकर
पालघर-दारूची चोरटी विक्री आणि तस्करीतून पालघर जिल्ह्यात केवळ अवैध व्यवसाय करणाऱ्यांचीच ‘चांदी’ झाली नसून, अशा गैरप्रकारांवर आळा घालण्याची जबाबदारी असणारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अनेक अधिकारीही ‘मालामाल’ झाले आहेत. एवढेच नव्हे तर, या विभागात कार्यालयीन कामकाजासाठी अनधिकृतपणे कार्यरत असलेल्या अनेक ‘झिरो नंबर’चीही चांगलीच वरकमाई झाल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यात दीर्घकाळापासून गैरमार्गाने लाखो रुपयांची ‘खाबूगिरी’ होत असतानाही वरिष्ठांनी बाळगलेले मौन आश्चर्याचा विषय ठरत आहे. यासोबतच गैरप्रकार करणाऱ्यांवर वरिष्ठांचा वरदहस्त असावा, अशीही चर्चा आहे.
जिल्ह्यात बिअर बार, बिअर शॉप, ढाबे, हॉटेल्स इत्यादी ठिकाणी दारूची विक्री केली जाते. यापैकी अनेकांकडून विनापरवाना हा व्यवसाय सुरू असून, त्याला राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अभय असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात बंदी असलेली दमण बनावटीची दारूही चोरट्या मार्गाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकली जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अनेकदा अशा ठिकाणांवर छापे टाकले जातात. त्यावेळी दारूसाठा जप्त करून गुन्हे दाखल केले जातात. जप्त केलेला साठा गोदामात ठेवला जातो. अशाप्रकारे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात दारूसाठा गोदामात ठेवण्यात आला आहे. काही वर्षांपासून हा साठा नष्टष करण्याचे आदेश नसल्याने तो तसाच पडून आहे. प्रत्यक्षात मात्र, जप्त केलेल्या या दारूपैकी जवळपास अर्धा साठा परस्पर ‘गायब’ झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या प्रकारात उत्पादन शुल्क विभागातीलच काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले हात ‘धुवून’ घेतले असल्याचेही समोर येत आहे. विशेष म्हणजे या दारूसाठ्याचे नियमितपणे ऑडिट करण्यात न आल्याचे संबंधितांचे चांगलेच फावले आहे. त्यामुळे आता तरी वरिष्ठांनी दखल घेऊन दारूसाठ्याचे ऑडिट करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
झिरो नंबर बनले ‘हिरो नंबर वन’
जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागात जवळपास २५ झिरो नंबर कार्यरत आहेत. कार्यालयीन कामे करण्यासह अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांची अधिकृत आणि ‘अनधिकृत’ जबाबदारीही ते पार पाडत आहेत. आपल्या अधिकाऱ्यांच्या आदेशाने हे झिरो नंबर बिअर बार तसेच अवैध दारूविक्रीच्या ठिकाणी छापे मारून वसुली करत असल्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडले आहेत. या माध्यमातून आपल्या अधिकाऱ्यांची ‘तुंबडी’ भरतानाच त्यांनी स्वतःचीही मोठी वरकमाई करून घेतली आहे. जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. यामुळे हे झिरो नंबर आता ‘हिरो नंबर वन’ बनले आहेत.

‘अर्थपूर्ण’ संबंधांमुळे सर्वकाही ‘सुरळीत’
जिल्ह्यातील बियर बार आणि बियर शॉपमधून अधिकृत विक्रीसोबतच बहुतांश प्रमाणात अवैधरित्याही विविध बनावटीच्या दारूची विक्री केली जाते. याशिवाय इतर ठिकाणीही अवैधरित्या दारूची विक्री केली जाते. त्यांच्यावरील कारवाईच्या माध्यमातून शासनाला लाखो रुपयांची महसूल प्राप्त होत आहे. तर दुसरीकडे अवैध दारूविक्रीमुळे लाखो रुपये काही अधिकारी-कर्मचाऱ्यांसह झिरो नंबरच्या खिशात जात आहेत.
जिल्ह्यात बिअर शॉप, ढाबे, हॉटेल्स अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे बाजूलाच टाकलेल्या तंबूत ‘तळीराम’ यथेच्छ मद्यपान करत असल्याचे चित्रही अनेक ठिकाणी दिसत आहे. मात्र, अशा ठिकाणी कठोर कारवाई केली जात नसल्याने व्यावसायिक आणि अधिकारी यांच्यात‘अर्थपूर्ण’ संबंध असल्याचेच स्पष्ट होत आहे.
..
अधीक्षकांकडून कारवाईचे संकेत
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम यांनी ‘लक्षवेधी’च्या वृत्ताची गांभीर्याने दखल घेतली असून, गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. जिल्ह्यातील झिरो नंबरना त्यांनी तत्काळ कामावरून काढण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच गोदामाची तपासणी व ऑडिट करून दोषींवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

















