जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात तापमानात घट झाली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये 10 अशांहून पहाटे आणि रात्री तापमानाची नोंद झाली आहे. तर दुपारी तापमान वाढ होत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरातही पहाटे तापमानात घट होत आहे.
तर दिवसा दमट हवामान राहात आहे. ग्रामीण भागांमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने त्याचा परिणाम फळबागा आणि भाजीपाल्यावर होत आहे.
द्राक्ष उत्पदक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून द्राक्षांना तडे जात आहे. त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाचा अलर्ट दिला आहे. राज्यात थंडीचा कडाका पुढचे तीन दिवस कायम राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा 10 अंशांहून खाली आला आहे.
जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून, पारा 8 अंशापर्यंत खाली आला आहे. मंगळवारी जळगाव शहराचं तापमान 8.2 अंश सेल्सियसवर पोहोचलं आहे. आगामी दोन दिवस थंडीचा जोर वाढणार असला तरी, 11 जानेवारीपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाचा अंदाज आहे. 8 ते 10 जानेवारीदरम्यान रात्रीच्या तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
जळगावमध्ये रात्रीचा पारा 6 ते 7 अंशापर्यंत खाली जाऊ शकतो. मात्र, 11 ते 15 जानेवारीपर्यंत पुन्हा जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाचीही शक्यता आहे, तर त्यानंतर 18 जानेवारीपासून पुन्हा जिल्ह्यात थंडीचा जोर वाढू शकतो, असा अंदाज देखील भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे हवामानात बदल झाला आहे. केरळच्या समुद्रकिनाऱ्यापासून काही किमीवर सायक्लोनिक सर्क्युलेशनसारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुढचे 2 दिवस 3 अंश सेल्सियसपर्यंत तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमानात 3 डिग्रीने वाढ दिसू शकते. तर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रिमझिम ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.