पुढील दोन महिन्यात आम्ही एक उपक्रम राबवणार आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला मराठी बोलता यायला हवे. महिनाभरात पहिल्या पाच हजार अमराठी लोकांसाठी एक ॲप तयार करण्यात येणार आहे.
त्यांना शालेय शिक्षण विभागामार्फत मोफत मराठी शिकवणी दिली जाणार आहे, अशी माहिती उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.
महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी ‘इमर्जिंग बिझनेस कॉन्क्लेव्ह, मुंबई चॅप्टर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात राज्याच्या विकासाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी उदय सामंत उपस्थित होते. यावेळी त्यांनी आगामी काळात महाराष्ट्रात येणारे उद्योग आणि मराठी भाषेबाबत आपली भूमिका मांडली.
उदय सामंत म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी यायला हवी अशी आमची इच्छा आहे. मात्र त्यावर कानशिलात लगावणं हा उपाय नाही. त्यापेक्षा आपण ॲप तयार करू. जर त्याने शिकायला नकार दिला तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र मराठी भाषा शिकविण्यासाठी मारहाण करणं योग्य नाही. त्याऐवजी आम्ही ॲप तयार करत आहे. मात्र अमराठी लोकांनी वेळ काढून या ॲपच्या साहाय्याने मराठी भाषा शिकायला हवी, असे ते म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी असा वाद सुरू आहे. याची परिणीती मारहाणीत होत आहे. अनेक ठिकाणी मराठी-अमराठीच्या मुद्द्यावरुन अमराठींना मारहाण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याबाबत उदय सामंत यांना प्रश्न करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्ती करुन आता मराठीचे गुणगाण गाणे चुकीचे आहे. ‘म’ मराठीचा राहिलेला नाही, ‘म’ आता महापालिकेचा आणि मतांचा झाला आहे, असा टोला त्यांनी लगाविला.