पालघर जिल्ह्यातील डहाणू, दापचरी परिसरात सोमवारी पहाटे 3 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भूकंपाचे धक्के बसताच लोक घरेदारे सोडून रस्त्यावर आले.
पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू होण्याची भीती व्यक्त होत असून भूकंप प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या आधी पालघर जिल्ह्यातील डहाणू, दापचरी आणि धुंदलवाडी परिसराला 31 डिसेंबर 2024 दुपारी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच हा धक्का बसल्याने स्थानिकांमध्ये निर्माण झाले.
पालघर जिल्ह्यात 2018 पासून वारंवार भूकंपाचे हादरे जाणवत आहेत. सतत बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे ग्रामीण भागातील काही घरांच्या भिंतींना तडे गेले होते. त्यामुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
याआधीही आॅगस्ट 2024 आणि आॅक्टोबर 2024 मध्ये डहाणू तालुक्यात भुकंपाचे धक्के बसले होते. आॅगस्ट महिन्यात तालुक्यात पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस असतानाच भूकंपाने जमीन हादरल्याने नागरिकांना भूकंपाची भीती वाटत असूनही घराबाहेरही झोपता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना भीतीच्या सावटाखाली दिवस काढावे लागले.