banner 728x90

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांचा प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

तारापूर एमआयडीसीतील सांडपाणी प्रक्रिया न करता नाल्यात

banner 325x300

कामगार, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पालघरः पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची मोठी औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीत सुमारे बाराशे उद्योग असून त्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करता नैसर्गिक नाल्यातून सोडले जाते. त्यामुळे नागरिक, कामगार व अन्य घटकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शेती आणि पिके संकटात आली आहेत. नैसर्गिक नाले थेट खाडी आणि समुद्राला मिळून मत्स्य व्यवसाय धोक्यात आले आहेत, असे शिवसेनेच्या शिंदे गटाचे पालघरचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी निदर्शनास आणले असून या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर थेट गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत.

पालघर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीत मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रकल्प आहेत. या रासायनिक प्रकल्पातून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून नंतर ते नैसर्गिक नाल्यात सोडणे अपेक्षित आहे; परंतु तसे न करता एमआयडीसीच्या वेगवेगळ्या प्रकल्पातील पाणी नैसर्गिक नाल्यात सोडले जाते. हा नाला कुंभवली गावाच्या अलीकडे अडवण्यात आला असून दोन समांतर गटारीमार्फत हे पाणी थेट खाडीत सोडले जाते.

प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांचा प्रदूषणालाच हातभार!
पूर्वी या नाल्याचे पाणी कुंभवली आणि परिसरातील शेतीत जाऊन तेथील पिकांची मोठ्या प्रमाणात हानी होत होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातील अधिकारी वसावे यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही ते या एमआयडीसीतील सांडपाण्याबाबत कोणत्याही तक्रारीची दखल घ्यायला तयार नाहीत. उद्योजकांशी हातमिळवणी करून त्यातून कोट्यावधी रुपयांचा मलिदा वसावे यांनी कमावला असल्याचा आरोप संखे यांनी केला असून, त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सांडपाण्याची दुर्गंधी
एमआयडीसीतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रचंड दुर्गंधी होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिक आणि कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कोणतीही दखल घेत नसल्याने नागरिक आणि कामगारांत संताप व्यक्त होत आहे. या संतापाला कुंदन संखे यांनी वाट मोकळी करून देताना आपल्या पद्धतीने त्यांना धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे.

मंत्र्यांना साकडे
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सिद्धेश कदम तसेच राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही या प्रश्नाकडे संखे यांनी लक्ष वेधले आहे. दुर्गंधीयुक्त पाणी जेथे साचले आहे, तेथेच कुंभवली गावच्या जलवाहिनी जातात. येथे जलवाहिनी फुटली असून, कुंभवली गावाला प्रदूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने आता त्या दुरुस्तीसाठी नाल्याला एमआयडीसीने घातलेला बांध फोडावा लागेल, असे सांगून संखे यांनी या प्रकरणी वसावे यांच्यासह संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वसावे यांच्या चौकशीची मागणी
वसावे गेली तीन वर्षे पालघर येथे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी म्हणून काम करत असून त्यांनी उद्योजकांशी हातमिळवणी करून कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे. त्यांची चौकशी करावी, त्यांना निलंबित करावे आणि त्यांची बदली करावी अशा मागण्या कुंदन संखे यांनी केल्या आहेत.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!