पालघर- योगेश चांदेकर
डहाणू-कोणतीही पूर्वपरवानगी न घेता डिजिटल दैनिक चालविल्याची, तसेच दिवाळी अंक प्रकाशित केले असल्याची कबुली संपादक शिक्षक शाहू भारती यांनी शिक्षण विभागाच्या चौकशी समितीसमोर दिली आहे. यासोबतच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता असमाधानकारक असल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोणती कारवाई करण्यात येईल, याकडे शिक्षणक्षेत्रासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

शिक्षक सेवा शर्तीच्या नियमांसह आरएनआयचे नियम पायदळी तुडवत ‘रयतेचा कैवारी’ होण्याच्या नादात संपादक शिक्षक शाहू भारती यांनी जवळपास चार वर्षे डिजिटल दैनिक चालविले. डिजिटल दैनिक ‘लक्ष्यवेधी’ने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन कारवाईसाठी पाऊले उचलली होती. त्यानुसार डहाणू पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाहू भारती यांना तातडीने खुलासा मागविला होता. त्यानंतर भारती यांनी या दैनिकासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे खुलाशात नमूद केले होते. मात्र, दिवाळी विशेषांकासाठी प्रकाशित केलेले जाहिरात दरपत्रक आणि वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित केलेल्या जाहिराती या बाबींच्या माध्यमातून ते व्यवसायही करत असल्याचे समोर होते. असे असतानाही ही बाब दडवून ठेवत भारती यांनी खुलाशाद्वारे शासनाची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे शिक्षण विभागाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत दिले होते. याच दरम्यान वरिष्ठांच्या आदेशानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती नियुक्त केली होती. त्यानंतर या समितीने शाहू भारती यांची प्रत्यक्ष चौकशी केली.
या चौकशी समितीसमोर शाहू भारती यांनी डिजिटल दैनिकासाठी आपण कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे कबूल केले आहे. यासोबतच या दैनिकाच्या माध्यमातून दिवाळी अंक तसेच जाहिरात दरपत्रक प्रकाशित केल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ताही असमाधानकारक असल्याचा ठपकाही चौकशी समितीच्या अहवालात ठेवण्यात आला आहे.
हा अहवाल पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून जिल्हा स्तरावर पाठविण्यात येणार असून, त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

वरिष्ठ अधिकारी निर्णय घेणार
शाहू भारती यांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता वृत्तपत्र सुरू केल्याचे कबूल केले आहे. दिवाळी अंक प्रकाशित केल्याचेही त्यांनी कबूल केले आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही असमाधानकारक आहे, अशा बाबी चौकशी समितीच्या अहवालात प्रथमदर्शनी निदर्शनास आल्या आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी दिली आहे. हा अहवाल जिल्हा स्तरावर पाठविण्याची कार्यवाही शिक्षण विभागाकडून केली जाईल. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी याबाबत निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले आहे.
..
‘आरएनआय’ नियमांच्या उल्लंघनाबाबत काय?
संपादक शिक्षक शाहू भारती यांनी डिजिटल दैनिक सुरू करण्यासाठी ‘आरएनआय’कडे नोंदणीच केली नाही. ‘आरएनआय’चे नियम पायदळी तुडवत त्यांनी जवळपास चार वर्षे दैनिक चालविले. या अनुषंगाने प्रशासन कधी आणि काय कारवाई करणार, हा प्रश्नही चर्चिला जात आहे. अनधिकृत रित्या दैनिक काढून शिक्षक शाहू भारती यांनी स्वतःला स्वयंघोषीत संपादक ही पदवी मिळवून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अनधिकृत रित्या जिल्ह्यात व तालूक्यात प्रतिनधी नेमून ओळखपत्रेही दिली असल्याचे समोर आले असून शासकीय कर्मचारी असतांनाही डहाणू पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मुरबाड मुरबीपाडा शाळेतील उपशिक्षक शाहू भारती यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांना एकप्रकारे आव्हानच दिले आहे त्यामुळे प्रशासन या सर्व बाबींवर काय कारवाई करते व रयतेचा कैवारी या अनधिकृत दैनिकात शाहू भारती यांनी अजून किती शासकीय कर्मचारी यांना सामावून घेतले आहे या सर्व बाबींची चौकशी करण्याची मागणी आता होत आहे

















