
पालघर-योगेश चांदेकर
शिक्षक सेवा शर्तीच्या नियमांसह ‘आरएनआय’चे नियम पायदळी तुडवत डिजिटल दैनिक चालविणारे संपादक शिक्षक शाहू भारती यांना शिक्षण विभागाने अखेर निलंबित केले आहे.
डिजिटल दैनिक ‘लक्ष्यवेधी’ने शाहू भारतींच्या या अनधिकृत ‘शाळेचा’ भंडाफोड केल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली होती. डहाणू पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते आणि गटशिक्षणाधिकारी वसंत महाले यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्राथमिक स्तरावर आवश्यक पाऊले उचलली होती. आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्याची आवश्यकता असताना, शाहू भारती यांनी नियमबाह्यरित्या डिजिटल दैनिक चालवण्याचा ‘प्रताप’ केल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे आणि जिल्हा शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या होत्या. चौकशी अहवालात शाहू भारती दोषी आढळल्याने अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबन काळात त्यांना तलासरी येथे ‘हजेरी’ द्यावी लागणार आहे.
निलंबित झालेले संपादक शिक्षक शाहू भारती यांनी त्यांच्या दैनिकासाठी यापूर्वी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींमध्ये किती शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, असा प्रश्न आता चर्चिला जात आहे. यासोबतच जिल्हा परिषद शाळांचे किती शिक्षक इतर व्यवसायांमध्ये गुंतले आहेत, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने आता या अनुषंगाने आपल्या स्तरावर ‘झाडाझडती’ घेण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

दरम्यान आरएन आय बाबतही शाहू भारती यांनी दैनिक रयतेचा कैवारी नंतर रयतेचा वाली अशा नावाने परवानगी न घेताच डिजिटल दैनिक काढत गेली अनेक वर्षे संपादक नावाने मिरवत स्वतः.ला अनधिकृत संपादक बनवत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात डिजिटल दैनिकाचे पदे घोषीत करून अवैध असे पत्रकार नियुक्त केले होते यातही काही शासकीय कर्मचारी असतांनाही शिक्षकांना सामावून घेतले होते त्यामुळे इतकी वर्षे अवैध दैनिकाची शाळा चालवणाऱ्या शाहू भारती यांच्यावर प्रशासनाचा वरदहस्त होताका हाही प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे याप्रकरणी आता उपविभागीय अधिकारी सुद्धा कारवाई करणारका असा प्रश्न उपस्थित होतोय
..
विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असतानाही शाहू भारतींप्रमाणे काही शिक्षक इतर व्यवसाय करत आहेत. काही जण स्वतःच, तर काही शिक्षक इतरांच्या नावाने असा प्रकार करत आहेत. या माध्यमातून शिक्षक आपले भविष्य उज्ज्वल करत असताना, दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने भवितव्य धोक्यात आले आहे. या आदिवासीबहुल जिल्ह्यातील काही शिक्षकांकडून ‘जोडधंदा’ सुरू असल्याने पालकांनाही पाल्यांची चिंता भेडसावत आहे. त्यामुळे अशा शिक्षकांची शिक्षण विभागाने तपासणी करावी, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

















