
पालघर-योगेश चांदेकर
पालघर-दारूची अवैध निर्मिती, विक्री आणि तस्करी रोखण्याची जबाबदारी असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याच काही अधिकाऱ्यांकडून प्रचंड प्रमाणात ‘खाबूगिरी’ केली जात असल्याचा प्रकार पालघर जिल्ह्यात सुरू असल्याचे समोर येत आहे. शासनाला चुना लावत स्वतःची तुंबडी भरण्यासाठी सातत्याने खटाटोप करणाऱ्या या अधिकाऱ्यांना वरिष्ठांचाही वरदहस्त प्राप्त असल्याची चर्चा आहे. या प्रकारामुळे ‘कुंपणानेच शेत खाल्ले’ या म्हणीचा प्रत्यय प्रशासनात येत असल्याचे दिसून येत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागातील एक दुय्यम निरीक्षक आणि त्याच्या सहकाऱ्याने मागील काही काळापासून आपल्या कार्यक्षेत्रात ‘उत्पादनाचे शुल्क’ खिशात घालण्याचा प्रकार चालविला आहे. या अधिकाऱ्यांनी लहान-मोठ्या ‘वसुली’तून समाधान न झाल्याने मोठा ‘प्रताप’ करत शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविल्याची विश्वसनीय माहिती आहे. दमण निर्मित दारूला महाराष्ट्रात बंदी असतानाही पालघर जिल्ह्यात चोरट्या मार्गाने ती आणली जात असून, तिची विक्रीही केली जात आहे. असे प्रकार रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सातत्याने कारवाई करण्यात आली. या दरम्यान जप्त केलेला दारूचा साठा शासकीय गोदामात ठेवण्यात आला. मात्र, उत्पादन शुल्क विभागातीलच या दोन अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत या गोदामातील दारू खासगी वाहनाद्वारे पळविली जात असल्याची माहिती मिळाली आहे. अशाप्रकारे गोदामातून आतापर्यंत जवळपास अर्धा दारूसाठा पळविण्यात आला आहे. यासोबतच परमीट रूम आणि बियर शॉपवर करण्यात आलेल्या कारवाईतील दारूसाठाही गोदामात पूर्वीएवढाच कायम आहे का, असाही प्रश्न चर्चिला जात आहे.

जिल्ह्यातील या सर्व गैरप्रकाराची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी चौकशी करावी, तसेच गोदामातील दारूसाठ्याचे तातडीने ऑडिट करावे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अशा प्रकाराबाबत माहिती घेऊन चौकशी करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया राज्य उत्पादन शुल्क पालघर विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम यांनी दिली आहे.
..
कितीच्या ‘संख्येने’ केसेस केल्या, किती दारूसाठा गायब?
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अनेकदा कारवाई करून दमण निर्मित दारू जप्त केली आहे. सील केलेला हा दारूसाठा शासकीय गोदामात ठेवण्यात आला आहे. मात्र, कारवाईवेळी जप्त केलेल्या साठ्यापैकी जवळपास अर्ध्या साठ्याची गैरमार्गाने परस्पर विल्लेवाट लावण्यात आल्याचा गंभीर प्रकारही घडल्याचे याच विभागाच्या वर्तुळात खासगीत चर्चिले जात आहे. त्यामुळे अशा प्रकरणात कितीच्या ‘संख्येने’ केसेस केल्या आणि किती दारूसाठा गायब झाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दारूसाठ्याला फुटले पाय!
विविध ठिकाणी कारवाई करत राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या प्रमाणात दमण निर्मित दारूचा साठा जप्त केला. हा साठा सील करून गोदामात ठेवला. मात्र, सद्यःस्थितीत यापैकी जवळपास अर्धा साठा नाहिसा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या साठ्याला ‘पाय फुटले’ असल्याची उपरोधिक टीका नागरिकांकडून केली जात आहे.
अधिकाऱ्यांची ‘भुरटी चोरी’
राज्य उत्पादन शुल्क विभागातील हे दोघे अधिकारी मोठ-मोठे ‘हात मारत’ असतानाच एकप्रकारे ‘भुरटी चोरी’ही करत असल्याचे अनेक प्रकारांवरून उघडकीस आले आहे. हे अधिकारी ताडीच्या दुकानावर धाड टाकून वसुलीचे प्रकार करत असल्याचे सांगितले जात आहे. चांदीप गावात काही दिवसांपूर्वी या अधिकाऱ्यांनी ताडीच्या एका दुकानात धाड टाकली. त्यावेळी दुकानाला परवाना नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दुकान मालकाने प्रकरण दाखल न करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. याशिवाय खानिवडे येथेही गुळाची एक कंपनी सील करण्याच्या कारवाईवेळी या अधिकाऱ्यांनी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार केल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे.

















