पालघर-योगेश चांदेकर
पालघरः मनोर विभागात उजव्या कालव्याचे तसेच गावातून जाणाऱ्या कालव्याचे काम सरकारी निकष डावलून अतिशय निकृष्ट पद्धतीने केले जात आहे. त्यामुळे कालव्याची सुरक्षितता धोक्यात आली असून, कालवा फुटला, तर त्याचा नागरिकांनाही फटका बसेल. शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान होईल. पाटबंधारे विभागाचे संबंधित शाखा अभियंता आणि ठेकेदाराचे संगनमत असल्याचा आरोप मनसेचे डहाणू तालुकाध्यक्ष यशोधन पाटील व मनसेचे शहर अध्यक्ष अमित शेट्टी कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
पाटील यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे केलेल्या तक्रारीत या कालव्यांच्या कामात काय त्रुटी आहेत, हे निदर्शनास आणले आहे. निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

निकृष्ट साहित्याचा वापर
पालघर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पाटील यांनी दिलेल्या निवेदनात पालघर उजव्या कालव्याच्या कामात सिमेंट, खडी, वाळूचा वापर करताना ती शासकीय मापदंडानुसार वापरलेली नाही. निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आला आहे. अंदाजपत्रक, तांत्रिक मापदंड आणि नियमांचे पालन करण्यात आलेले नाही, असे त्यांनी निदर्शनास आणले आहे. दरम्यान सदर कामे निविदा मिळालेल्या ठेकेदाराने न करता ती इतर ठेकेदारांकडून करून घेतल्याने कामाचा दर्जा खालावला असल्याचे स्थानीक ग्रामस्थांकडून सांगण्यात आले
अल्पावधीतच तडे
निकृष्ट साहित्य, तांत्रिक चुका, अननुभवी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा यामुळे अल्पकाळातच कामाला तडे गेले आहेत. त्यामुळे कालव्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे. कामाची जाडी, मजबुती व गुणवत्ता कमी आहे. अपूर्ण व निकृष्ट कामे असतानाही मोजमाप पुस्तिकेत मात्र चांगल्या प्रतीची कामे झाल्याचा आणि तांत्रिकता पूर्ण केल्याचा उल्लेख आहे.
अधिकाऱ्यांची मिलीभगत?
पालघर पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्यांनी ठेकेदाराला पाठिशी घातले आहे?. त्यांचे निकृष्ट कामात संगनमत आहे. या कामाची उच्चस्तरीय व तांत्रिक चौकशी करावी. गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून कामाचा अहवाल घ्यावा, तोपर्यंत अधिकाऱ्यांना कामापासून दूर ठेवावे, अशी मागणी यशोधन पाटील आणि अमित शेट्टी यांनी केली आहे. पाटील यांनी पुराव्यासाठी कामाची काही छायाचित्रेही निवेदनासोबत जोडली आहेत. आता कार्यकारी अभियंता काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

















