banner 728x90

‘राष्ट्रवादीला अर्थखातं मिळणार नाही’, रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ; सुनेत्रा पवारांना अमित शाहांनी भेट नाकारल्याचा दावा

banner 468x60

Share This:

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे पुन्हा एकदा अर्थखातं सोपवलं जाणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. मात्र, अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्थखातं देण्यात आलेलं नाही.

याच मुद्यांवर बोलताना आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘राष्ट्रवादीला (अजित पवार) अर्थखातं मिळण्याची शक्यता कमी आहे’, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नुकतेच मुंबईत आले होते. मात्र, अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट नाकारली. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला एवढं महत्वाचं खातं (अर्थखातं) मिळेल असं वाटत नाही. खरं तर अर्थखात्याचा हक्क हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा आहे”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

“अजित पवार नसताना आता हळूहळू राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे. हे आम्ही याआधीही अनेकदा बोलून दाखवलेलं आहे. जर अर्थखातं हातात आलं तर बऱ्याच महत्त्वाच्या नाड्या हातात येतात, त्यामुळे भाजपाला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षालाही हे नको असावं. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला अर्थखातं मिळेल असं मला तरी वाटत नाही”, असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

banner 325x300

अर्थखात्याबाबत जय पवारांनी काय म्हटलं होतं?

अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीला मिळण्याबाबत जय पवार यांनी काही दिवसांपूर्वी मोठं भाष्य केलं होतं. बारामतीमधील एका कार्यक्रमात बोलताना जय पवार यांनी म्हटलं होतं की, “सगळे बोलत आहेत की आपलं अर्थखातं अजून आपल्या पक्षाकडे आलं नाही. त्यामुळे काही ठिकाणी आपली विकास कामं थांबली आहेत. मात्र, असं नाहीये. अजितदादा आपल्याला अचानक सोडून गेले आणि त्यानंतर लगेचच अर्थसंकल्प होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखातं त्यांच्याकडे घेण्याचा निर्णय घेतला. पण आता काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि आमची सर्वांची चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सांगितलं आहे की लवकरात लवकर अर्थखातं आपल्याला दिलं जाईल. अजित पवार यांचं विकास कामांबाबतचं जे स्वप्न होतं, ते आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू”, असं जय पवार यांनी म्हटलं होतं.

सुनेत्रा पवारांवरील ‘गुंगी गुडिया’च्या टीकेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

“सुनेत्रा वहिनींनीबद्दल काँग्रेसने केलेलं वक्तव्य अयोग्यच होतं. मी स्वतः काँग्रेसच्या नेत्यांशी बोलले आहे. मी काँग्रेसच्या नेतृत्त्वाचे आभार मानते. कारण, मी काँग्रेसशी बोलल्यानंतर अर्ध्या तासात काँग्रेसने त्यांची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसची जी महाराष्ट्रातील स्थानिक सोशल मीडिया टीम आहे, त्यांच्याकडून हे वक्तव्य झालेलं आहे. हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं मत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि देशातील काँग्रेस यांच्यात वेगळी मतं आहे. केंद्रातील काँग्रेस पक्षाने स्पष्ट भूमिका केली आहे की, कोणत्याही महिलेबद्दल किंवा व्यक्तीबद्दल अशी टीका का करावी. टीका करायची असेल तर अनेक शब्दांनी टीका केली जाते, पण कोणाचाही अपमान होईल, अशी टीका करू नये, असं आमचं मत आहे. कोणत्याही व्यक्तीबद्दल टोकाची भूमिका घेणं हे मराठी संस्कृतीला न शोभणारं आहे. माझी काँग्रेसला विनंती आहे की जे झालं ते सोडून देऊया. केंद्रातील काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवून निर्णय घेतला आहे”, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!