Devendra Fadnavis Nalasopara: सत्ता कोणाच्या हातात असू नये याचे उत्तम उदाहरण म्हणजे वसई विरार महापालिका आहे. सत्ताधाऱ्यांनी या महापालिकेचा वापर एटीएम म्हणून केला. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून स्वतःची घर भरली आणि त्यामुळे वसई विरार शहराचा विकास मंदावला, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हितेंद्र ठाकूरांवर केली आहे.
वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नालासोपारा येथील सेंट्रल पार्क मैदानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजयी संकल्प सभा पार पडली.यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार हेमंत सवरा, आमदार स्नेहा दुबे पंडीत, आमदार राजन नाईक, आमदार विलास तरे, , श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडीत यांसह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच यावेळी महायुतीचा वचननामा देखील प्रसिद्ध करण्यात आला.
पुढे बोलताना, भ्रष्टाचार गुंडागर्दी लोकांना धमकावणे वर्षं वर्षानुवर्षे आपण पाहिलं आणि जाणीवपूर्वक एकीकडे अवैध बांधकाम करायचे आणि दुसरीकडे लोकांना धमक्या द्यायच्या आणि निवडून यायचं अशी वसई विरारची परिस्थिती झाली होती. मुंबईसाठी धडपडणारी नगरी अशी वसई विरारची ओळख होती. पण कालांतराने शहरात दहशतीचे राज्य तयार झाले हे सगळे क्षेत्र वेगळ्याच कारणासाठी ओळखू जाऊ लागले. खून, मारामारी, दरोडे असे वेगवेगळे धंदे इथे सुरू झाले. रेती माफिया, टँकर माफिया, रॉकेल माफिया यांच्यामुळे सामान्य माणसाचे जगणे मुश्किल झाले असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
२०१४ नंतर आम्ही शहरांचा विकास केला. पण, वसई विरारमध्ये आम्हाला प्रवेश नव्हता. इथे बसलेल्या सत्ताधाऱ्यांना विकास जनतेपर्यंत पोहोचू द्यायचा नव्हता त्यामुळे त्यांनी विकासात अडथळे निर्माण केले होते अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच यापूर्वी तुम्ही पहिला अडथळा दूर केला आहे. आधी खासदार होतेच. आता तुम्ही आमदारही निवडून दिले आहेत. त्यामुळे येत्या १५ तारखेला दुसरा अडथळा दूर करा. मग बघा कसा वसई विरारचा सुपरफास्ट विकास करून दाखवतो, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मतदारांना दिले.
अनधिकृत बांधकामावरून ठाकूरांवर टीका
काही विकासक आणि सत्ताधारी यांनी मिळून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केलं आणि आणि ते सर्वसामान्य नागरिकांना भोगाव लागतंय. कधी कुठून आदेश येतो तर कधी सर्वोच्च न्यायालयातून आदेश येतो. आणि बांधकामावर तलवार पडते. पण, यासाठी आम्ही नवीन क्लस्टर योजना आणू, कोणाची घरं तुटू देणार नाही. ती नियमित करण्यासाठी विशेष योजना आणू आणि या योजनेच्या माध्यमातून त्यांचे अनधिकृत पाप आम्ही अधिकृत इमारतीच्या स्वरूपात परिवर्तित करू असेही फडणवीस म्हणाले. तसेच गेली अनेक वर्षे महापालिका निवडणुका आल्या की हे तुम्हाला घाबरवतात. तुमचं घर तोडून टाकू, तुमचं पाणी बंद करून टाकू, ते आले तर तुमची घरं तोडतील. पण, एक लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे घर देणाऱ्यांपैकी आहेत, तर घर घेणाऱ्यांपैकी नाही. ही देना बँक आहे लेना बँक नाही. घरांना वाचवून वसई विरार आणि नालासोपारा अधिकृतरित्या विकसित करू, असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना दिले.
पायाभूत सुविधांचे आश्वासन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नालासोपारा येथील सभेत बोलताना शहरातील पायाभूत सुविधांचा विकास करणार असल्याचे आश्वासन देखील नागरिकांना दिले. या प्रामुख्याने खालील सुविधांचा समावेश होता:
-मिरारोड ते विरार २३ किमीची मेट्रो १३
-रेल्वे मार्ग आणि स्थानकात नव्या सोयीसुविधा
-अलकापुरी (नालासोपारा) येथे नव्हे रेल्वे स्थानक
-स्वयंचलित दरवाजे असणारे वातानुकूलित रेल्वे डबे
-उत्तर विरार सागरी सेतू
-विरार अलिबाग कॉरिडोर
-बुलेट ट्रेन
-रोजगाराच्या नवीन संधी
-समूह पुनर्विकास योजना
– सांडपाणी प्रकल्प
-पूरस्थिती नियंत्रणासाठी उपाययोजना
-हरित पट्ट्याचे संरक्षण
-कोळीवाड्यांचे सर्वेक्षण
-पाणीपुरवठा योजना

















