banner 728x90

‘दुबार व्यवसाय करणाऱ्या बळवंत क्षीरसागर यांच्यावर जिल्हा परिषदेची कारवाई” दोन वेतनवाढी रोखल्या ‘लक्षवेधी’च्या बातमीचा परिणाम

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

पालघरः जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शिकवणे, त्यांची गुणवत्ता वाढवणे आदी कामे करण्याऐवजी अनेक शिक्षक शाळाबाह्य कामे करीत होते. ‘लक्षवेधी’ने याप्रकरणी आवाज उठवल्यानंतर प्राप्तिकर सल्लागार म्हणून काम करणारे जिल्हा परिषदेचे प्राथमीक शिक्षक बळवंत क्षीरसागर यांची चौकशी करून त्यांच्यावर दोषारोप निश्चित करण्यात आले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी क्षीरसागर यांच्या दोन वेतनवाढी रोखल्या असून, तशी नोंद सेवा पुस्तिकेत करण्याचे आदेश दिले आहेत.

banner 325x300

पालघर जिल्ह्यात अनेक शिक्षक विविध प्रकारचे दुबार व्यवसाय करत आहेत. प्राप्तिकर सल्लागार, जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार आदी कामात शिक्षक व्यस्त असतात. अनेकदा हे शिक्षक शाळेला दांडी मारून खासगी कामांना प्राधान्य देतात. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावला आहे. यावर ‘लक्षवेधी’ने वृत्तमालिकेतून प्रकाश टाकून अनेक शिक्षकांच्या शाळाबाह्य कामांचा पर्दाफाश केला.

लक्षवेधी’कडून गैरप्रकारांचा पर्दाफाश
उपशिक्षक बळवंत हरिदास क्षीरसागर हे पत्नीच्या नावे प्राप्तिकार सल्लागाराची कामे स्वतःच करीत होते. तहसीलदार कर्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, एकात्मिक बालविकास विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्राप्तिकर परताव्याची कामे ते स्वतः करीत व एजन्सी पत्नीच्या नावे आहे असा कांगावा करीत होते. त्यांनी खासगीत या कामाची कबुली दिली होती. ‘लक्षवेधी’ने त्यावर वारंवार आवाज उठवला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना दुरुत्तरे
गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी केली. चौकशीसाठी गेले असता वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही क्षीरसागर यांनी उद्धटपणे उत्तर देऊन, ‘तुम्ही माझी चौकशी करू शकत नाही,’ असा पवित्र घेतला. ‘माझ्या खासगी आयुष्यात मला काय करायचे आणि काय करायचे नाही याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे,’ असे उत्तर त्यांनी दिले. हा महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ चा ३४ चा भंग आहे.

सेवाविषयक अटींचा भंग
क्षीरसागर हे रणकोळ येथे प्राथमिक शिक्षक असून त्यांनी वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी तसेच पालक भेटी घेतल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे त्यांनी सेवाविषयक अटी व शर्तीचा भंग केला असल्याचा निष्कर्ष जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अहवालात नोंदवण्यात आला आहे. गटविकास अधिकारी तसेच विस्तार अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल आणि क्षीरसागर यांचे म्हणणे मागवून त्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपला अहवाल तयार केला.

दोषारोप सिद्ध
क्षीरसागर हे पत्नीच्या नावे प्राप्तिकर विषयी खासगी कामे करून शाळेकडे व विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे, गुणवत्तेकडे दुर्लक्ष करतात हे चौकशीत स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद शिक्षकांनी कर्तव्यपरायण राहून सचोटीने काम करणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र जिल्हा सेवा वर्तणूक नियम १९६७ मधील नियम तीनमध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. असे असताना क्षीरसागर यांनी मात्र कर्तव्यात कसूर करून नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करताना त्यांनी दिलेला खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी अमान्य केला*

दुबार काम करणाऱ्यांना चाप बसणार
शिस्तभंग विषयक अधिकारी या नात्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम १९६४ मधील भाग तीन, शिस्त चार मधील तरतुदीनुसार दोन वेतनवाढी रोखण्याचा आदेश दिला असून तशा नोंदी सेवा पुस्तिकेत करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उचललेल्या या कठोर पावलामुळे आता जिल्हा परिषदेत दुबार कामे करणाऱ्या शिक्षकांना चाप बसणार आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!