पालघर – योगेश चांदेकर
पालघरः डहाणू नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष निवडून आणता आले नसले, तरी भारतीय जनता पक्षाचे नगरपालिकेत बहुमत आहे. या बहुमताच्या जोरावर भाजपने उपनगराध्यक्षांसह विषय समित्यांची पाचही सभापतिपदे खेचून आणली. स्वीकृत नगरसेवकपदी ही भाजपच्या दोघांची निवड झाली. उपनगराध्यक्ष जगदीश राजपूत यांच्यासह अन्य सर्व पदाधिकाऱ्यांनी आज डहाणू नगरपालिकेत पदभार स्वीकारला.
डिसेंबर महिन्यात डहाणू नगरपालिकेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी झाला नाही;परंतु २७ पैकी १७ नगरसेवक निवडून आणण्यात भाजपाला यश आले. त्यानंतर जगदीश राजपूत यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. आता आरोग्य समितीच्या सभापतिपदी विक्रम नायक, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी शुभांगी पाटील, शिक्षण समितीच्या सभापतिपदी शैलेश राकामुथा बांधकाम समिती सभापतीपदी विशाल नांदलसकर,पाणीपुरवठा सभापतीपदी प्रदीप चाफेकर यांची निवड झाली. उपनगराध्यक्ष हे एका विषय समितीचे पदसिद्ध सभापती आहेत. याशिवाय स्वीकृत सदस्य म्हणून भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत व धनंजय मेहेर यांची निवड झाली. या सर्वांचा आज उपनगराध्यक्ष पदग्रहण समारंभाच्या वेळी सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार हरिश्चंद्र भोये, जेष्ठ नेते बाबाजी काठोळे आदी उपस्थित होते.

डहाणूला आदर्श नगरपालिका करू
या वेळी काठोळे म्हणाले, की डहाणू नगरपालिकेची नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यात आपल्याला अपयश आले असले, तरी त्याचे दुःख बाजूला ठेवून नगरपालिकेच्या माध्यमातून डहाणूचा कायापालट करण्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करूयात. भाजपचे पाच सभापती नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांवर निवडून आले. भरत राजपूत यांना कामाचा प्रचंड अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू नगरपालिकेला आदर्श नगरपालिका बनवण्याचा प्रयत्न करू.
विकासाच्या कामात राजकारण नाही
या वेळी भरत राजपूत म्हणाले, की पालघर जिल्ह्यात भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष करू, असे आपण जाहीर केले होते. त्यानुसार कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्ह्यात स्वीकृतसह ५८ नगरसेवक आहेत. दोन नगराध्यक्ष आणि तीन उपनगराध्यक्ष आहेत. यापूर्वी जसे आपण सर्वांनी प्रामाणिकपणे काम केले तसेच काम यापुढेही करू. विकासाच्या कामात राजकारण आणणार नाही. नगरपालिकेत आमचे बहुमत आहे. सरकारही आमचेच आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी आणू. मुख्याधिकाऱ्यांनीही शहर विकासाच्या बाबतीत नगरसेवकांच्या भावना जाणून घेऊन आम्हाला सहकार्य केले पाहिजे.

















