विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नोंदींमध्ये दुरुस्ती करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार (दि. १२) आहे. पात्र नागरिकांनी अंतिम मतदार यादीत आपले नाव सुनिश्चित करावे, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ८ ऑक्टोबरपर्यंत ७ लाख १९ हजार ३८२ अर्ज प्राप्त झाले आहेत. मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी ३ लाख ९९ हजार ९२५ अर्ज, तर नावे वगळण्यासाठी १८ हजार ७४८ अर्ज दाखल झाले आहेत.
एक ऑक्टोबर किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे नवमतदार तसेच अन्यथा पात्र असूनही प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांना नमुना क्रमांक ६ मधील अर्ज आणि आवश्यक घोषणापत्र भरून नाव नोंदविता येणार आहे.
आवश्यक कागदपत्रांसह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करता येतील. याशिवाय भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
मागील विशेष सखोल पुनरीक्षणातील नोंदींशी जुळवणी न झाल्यामुळे किंवा जुळवणी होऊनही तार्किक विसंगती आढळल्यामुळे नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांना संबंधित कागदपत्रे सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.
आयोगाने नोटिशीत नमूद केलेल्या कागदपत्रांपैकी एखादे कागदपत्र उपलब्ध नसल्यास अन्य वैध कागदपत्र किंवा दस्तऐवज सादर करता येणार आहे. यासाठी विहित १३ कागदपत्रांव्यतिरिक्त अन्य कागदपत्रे सादर करण्याची सुविधाही मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनी अनुप्रयोगावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg