banner 728x90

Maharashtra Board HSC Exam 2026 : आजपासून राज्यात बारावीची परीक्षा सुरू; 15 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार

banner 468x60

Share This:

Maharashtra Board HSC Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा आज, मंगळवार 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत.

राज्यभरातील 10 हजार 664 शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील 15 लाखांहून अधिक विद्यार्थी या महत्त्वाच्या परीक्षेला बसणार आहेत. यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत 27 हजारांची वाढ झाली आहे.

राज्यातील 9 विभागीय मंडळांमार्फत परीक्षा

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यंदा एकूण 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये 8 लाख 20 हजार 229 मुले, 7 लाख 12 हजार 240 मुली आणि 18 तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

आयटी आणि सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा

माहिती तंत्रज्ञान (IT) आणि सामान्य ज्ञान (GK) या विषयांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. माहिती तंत्रज्ञान विषयासाठी 2 लाख 36 हजार 320 विद्यार्थ्यांनी, तर सामान्य ज्ञान विषयासाठी 1 हजार 708 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी बारावी परीक्षेसाठी 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.

वेळापत्रक, अतिरिक्त वेळ आणि निर्बंध

विद्यार्थ्यांनी केवळ राज्य मंडळाने अधिकृतरित्या प्रसिद्ध केलेले आणि छापील वेळापत्रकच ग्राह्य धरावे, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. यंदाही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटांची अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या 9 जानेवारीच्या शासन निर्णयानुसार परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई

कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी जिल्हा दक्षता समितीवर राहणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे संचालक डॉ. बेडसे यांनी दिली आहे.

सीसीटीव्ही नसलेल्या केंद्रांवर कर्मचाऱ्यांची अदलाबदल

राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही व्यवस्था अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, 172 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही नसल्याने त्या केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. सीसीटीव्ही नसलेली सर्वाधिक 55 परीक्षा केंद्रे अमरावती विभागात असून, राज्यातील एकूण 248 परीक्षा केंद्रे संवेदनशील म्हणून ओळखली गेली आहेत.

गुगल मीट, झूमद्वारे देखरेख

दहावी आणि बारावीच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. काही जिल्ह्यांमध्ये, विशेषतः सांगली जिल्ह्यात, सीसीटीव्ही नसलेल्या केंद्रांवर गुगल मीट आणि झूम प्रणालीद्वारे थेट देखरेख ठेवण्यात येणार आहे. भरारी पथकांना आकस्मिक भेटी देण्याचे निर्देश देण्यात आले असून, विभागीय मंडळांअंतर्गत विशेष व बैठी पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. गैरप्रकार घडल्यास केंद्रावरील तसेच पथकातील कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

banner 325x300

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!