banner 728x90

लाल झेंड्याचा मावळता सूर्य…!

banner 468x60

Share This:

रायगड जिल्ह्याच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्षाचे नाव म्हणजे एकेकाळी अभिमानाचे प्रतीक होते. कष्टकरी, शेतकरी आणि सामान्य माणसाच्या घामातून उभा राहिलेला हा पक्ष जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहचलेला होता. पंचायत समिती, जिल्हा परिषद, सहकारी संस्था आणि कामगार चळवळीवर त्याची घट्ट पकड होती. पण कालच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी हा सारा इतिहास झाकोळून टाकला. रायगडच्या राजकारणातून शेकापची झालेली हद्दपारी हा केवळ निवडणुकीतील पराभव नाही, तर एका विचारधारेच्या अधःपतनाची कहाणी आहे.

banner 325x300

एक काळ असा होता की प्रभाकर पाटील, दि. बा. पाटील, दत्ता पाटील, मीनाक्षी पाटील, मोहन पाटील आणि दत्तूशेठ पाटील यांसारख्या धडाडीच्या नेत्यांनी संपूर्ण रायगड जिल्हा पिंजून काढला होता. पोलादपूरसारखा दुर्गम डोंगराळ भाग असो, कर्जतची आदिवासी वस्ती असो, म्हसळ्याची खेडी असोत किंवा श्रीवर्धनचा समुद्रकिनारा या प्रत्येक भागात त्यांनी शेकापचा झेंडा अभिमानाने रोवला. त्या काळात नेता हा केवळ व्यासपीठावरचा वक्ता नव्हता. तो कार्यकर्त्यांच्या घरात जाणारा, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा आणि रस्त्यावर उतरून लढणारा चळवळीचा माणूस होता. त्यामुळे दुर्गम भागातही पक्षाचा कार्यकर्ता जिवंत राहिला, मजबूत राहिला.

पण हाच वारसा पुढे नेण्यात आजचे नेतृत्व अपयशी ठरले. पराभवाची बीजे एका दिवसात पेरली गेली नाहीत. गेल्या काही वर्षांत पक्ष हळूहळू जनतेपासून तुटत गेला. काळ बदलत असताना शेकाप मात्र जुन्याच मानसिकतेत अडकून राहिला. नवे सामाजिक प्रश्न, तरुण पिढीच्या अपेक्षा, रोजगाराची समस्या, बदलते राजकीय गणित या सगळ्यांकडे दुर्लक्ष झाले. लोकांशी थेट संपर्क कमी झाला आणि संघटनात्मक बांधणी ढासळत गेली.

या पराभवामागचा सर्वात मोठा दोष नेतृत्वाच्या बेजबाबदारपणाचा आहे. कार्यकर्ते हा पक्षाचा आत्मा असतो, पण त्याच कार्यकर्त्याला गेल्या काही वर्षांत बाजूला ढकलले गेले. निर्णय काही मोजक्या लोकांच्या हातात केंद्रीत झाले. नवे चेहरे पुढे आणण्याची हिंमत दाखवली गेली नाही. कार्यकर्त्यांना बळ देण्याऐवजी त्यांचे मनोबल खच्ची केले गेले. परिणामी, निष्ठावान कार्यकर्ते निराश झाले आणि मतदार दुरावला.

भांडवलशाही धोरणांचा वाढता प्रभाव हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ठरला. शेकापची ओळखच मुळात कष्टकरी वर्गाच्या बाजूने उभे राहणारा पक्ष अशी होती. पण बदलत्या आर्थिक व्यवस्थेला समर्थपणे उत्तर देणारी ठोस भूमिका पक्ष घेऊ शकला नाही. नव्या उद्योगधंद्यांविषयी, रोजगारनिर्मितीविषयी, तरुणांच्या भविष्याविषयी कोणतीही स्पष्ट दिशा दिसली नाही. घोषणा राहिल्या, पण कार्यक्रम उरला नाही. म्हणूनच मतदारांनी इतर राजकीय पर्याय स्वीकारले.

पक्षाला आतून पोखरणारा आणखी एक मोठा रोग म्हणजे भाऊबंदकी आणि गटबाजी. अनेक ठिकाणी अंतर्गत मतभेद इतके टोकाला गेले की विरोधकांशी लढण्याऐवजी आपापसातच लढाया सुरू झाल्या. व्यक्तिगत स्वार्थ आणि अहंकार यामुळे संघटना कमकुवत झाली. कालच्या निकालात अनेक जागांवर शेकापचे उमेदवार आपल्याच लोकांच्या नाराजीचे बळी ठरले, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा हा निकाल शेकापसाठी धोक्याची घंटा आहे. ज्या जिल्ह्यात लाल झेंडा सत्तेचा केंद्रबिंदू होता, तिथे आज पक्ष अस्तित्वासाठी धडपडत आहे. हा पराभव केवळ राजकीय आकडेवारीचा नाही, तर संपर्क, विश्वास आणि विचारांच्या तुटलेल्या नात्याचा पराभव आहे.

तरीही या पराभवात एक संधी लपलेली आहे. शेकापने जर खरे आत्मपरीक्षण केले, जुन्या परंपरेतील चांगल्या गोष्टी पुन्हा स्वीकारल्या, नव्या पिढीला नेतृत्वाची संधी दिली आणि सामान्य कार्यकर्त्याला पुन्हा केंद्रस्थानी आणले, तर पुनरुज्जीवन शक्य आहे. प्रभाकर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उभारलेली संघर्षाची परंपरा अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. त्या परंपरेशी पुन्हा नाळ जोडली तर पक्षाला नवी उभारी मिळू शकते.

पण त्यासाठी सर्वप्रथम नेतृत्वाने अहंकार सोडावा लागेल. जमिनीवर उतरून लोकांशी संवाद साधावा लागेल. केवळ नावावर राजकारण चालत नाही, कामावर चालते हे स्वीकारावे लागेल. अन्यथा रायगडच्या इतिहासात कधीकाळी दणदणीत आवाज करणारा हा पक्ष केवळ आठवणींच्या पुस्तकातच उरेल.

कालचा निकाल हा शेवट नाही, पण गंभीर इशारा मात्र नक्की आहे. हा इशारा समजून घेणे किंवा दुर्लक्ष करणे यावरच शेकापचे भविष्य अवलंबून आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!