पालघर-योगेश चांदेकर
पालघर– सार्वजनिक जीवनात सातत्य, संयम आणि समाजनिष्ठा या तीन गुणांची सांगड घालणारं व्यक्तिमत्त्व क्वचितच पाहायला मिळतं. पालघर जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात ज्यांनी आपल्या कार्यानं वेगळी छाप उमटवली, असं नाव म्हणजे पालघर जिल्हा काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष बाबा जोशी. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेताना केवळ एका राजकीय नेत्याचा गौरव होत नाही, तर एका समर्पित समाजसेवकाच्या प्रवासाला सलाम केला जातो.

अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे मुंबईचे अध्यक्ष बाबा जोशी उर्फ जयप्रकाश कृष्णकुमार जोशी यांनी राजकारणाकडं कधीही सत्तेच्या दृष्टीनं पाहिले नाही; तर त्यांनी ते लोकसेवेचं माध्यम मानलं. एका समाजाचे अध्यक्ष म्हणून काम करतानाही त्यांनी अन्य समाजघटकांनाही कायम न्याय देण्याचं काम केलं. काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीशी निष्ठा ठेवत त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ दिलं. जिल्हा स्तरावर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय ठरले. संघटना बांधणी, कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन आणि विविध सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेणं या सर्व बाबींमध्ये त्यांचं नेतृत्व उठून दिसलं. पालघर जिल्हा हा सामाजिक, भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्या विविधतेनं नटलेला जिल्हा आहे. आदिवासी भागातील प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी, युवकांच्या रोजगाराच्या समस्या आणि शिक्षणाच्या सुविधा या सर्व मुद्द्यांवर त्यांनी सातत्यानं आवाज उठवला. त्यांच्या प्रयत्नांमुळं अनेक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचले आणि त्यावर तोडगा निघण्यास मदत झाली. जनतेच्या अडचणी स्वतःच्या समजून त्यावर काम करण्याची त्यांची वृत्ती हीच त्यांच्या लोकप्रियतेचं खरं कारण ठरली. राजकारणात मतभेद असतात, परंतु मनभेद नसावेत, हा त्यांचा दृष्टिकोन होता. विरोधकांशीही संवादाची दारं उघडी ठेवून त्यांनी लोकशाही मूल्यांचा सन्मान केला. संयमी भाषा, समतोल विचार आणि स्पष्ट भूमिका यांमुळे ते सर्वपक्षीयांचे आदराचे मानकरी ठरले. त्यांचं सार्वजनिक जीवन हे सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणाचं उदाहरण म्हणून पुढं ठेवावं लागेल. अमृतमहोत्सव हा केवळ वयाचा टप्पा नसून अनुभवाच्या परिपक्वतेचा उत्सव आहे. बाबा जोशी यांच्या आयुष्याचा हा टप्पा त्यांच्या दीर्घ आणि समर्पित कार्याचा साक्षीदार आहे. आजच्या पिढीनं त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, समाजासाठी काहीतरी देण्याची जाणीव ठेवावी, हा संदेश त्यांच्या जीवनप्रवासातून मिळतो. पालघर जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात त्यांचं योगदान विशेष उल्लेखनीय राहील. एखाद्या व्यक्तीचा ७५ वर्षांचा प्रवास हा केवळ वयाचा टप्पा नसतो; तर तो संघर्ष, जिद्द, मूल्यनिष्ठा आणि परंपरेशी असलेल्या नात्याची साक्ष देणारा जीवनप्रवास असतो. तत्कालीन ठाणे जिल्हा काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष, पालघर जिल्हा काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष तसंच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सदस्य म्हणून कार्यरत राहिलेल्या आणि आज पूर्णतः समाजकारण व शिक्षणसेवेला वाहून घेतलेल्या बाबा जोशी (जयप्रकाश कृष्णकुमार जोशी) यांची जीवनगाथा ही अशाच मूल्यांचा दीपस्तंभ आहे.
मर्यादित साधनसंपत्तीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिद्दीनं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण घेत असतानाच शिक्षक म्हणून शिक्षणक्षेत्रात प्रथम पाऊल टाकलं. व्यवसाय करत करत शिक्षण पूर्ण करण्याची कसरत त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. नोकरीचा कालावधी अवघा चार वर्षांचा; परंतु पुढील चाळीस वर्षे त्यांनी स्वतःच्या निर्णयक्षमता आणि परिश्रमाच्या बळावर व्यवसायक्षेत्रात भक्कम स्थान निर्माण केलं. कार विक्री व पश्चात सेवा या क्षेत्रात त्यांनी प्रामाणिकपणा, ग्राहकविश्वास आणि शाश्वत उत्पन्नाची भक्कम पायाभरणी केली. आर्थिक स्थैर्य निर्माण करताना सामाजिक जबाबदारीची जाणीव त्यांनी कायम ठेवली. त्यांचे वडील कृष्णकुमार मार्तंड जोशी (कुमार महाराज) यांच्या ७५ व्या वर्षानिमित्त दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणं हे त्यांचं जीवनध्येय बनलं. त्या वचनपूर्तीतून ‘कुमार महाराज जोशी प्रतिष्ठान’ या ट्रस्टची स्थापना झाली. याच प्रतिष्ठानच्या माध्यमातून ‘श्री कुमार महाराज आदिवासी वसतिगृह’ बांधून ते वाणगाव एज्युकेशन सोसायटीला अर्पण करण्यात आलं आहे. सध्या या वसतिगृहात ५० आदिवासी विद्यार्थी निवासी शिक्षण घेत असून, त्यांच्या निवास, शिक्षण व दैनंदिन व्यवस्थेची जबाबदारी वाणगाव एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त म्हणून ते स्वतः पाहत आहेत. ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी हा उपक्रम विशेष मोलाचा ठरत आहे. नुकताच त्यांचा ब्रह्मवृंद सेवा मंडळ चिंचणी यांचेमार्फत परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांचे हस्ते अमृत महोत्सव निमित्त सत्कारही करण्यात आला. वाणगाव येथे मातोश्री राधा जोशी यांच्या मृत्यूनंतर मुक्तीधाम बांधून ग्रामपंचायतीला अर्पण केलं. चिंचणी ब्राह्मणआळी येथे मोफत वाचनालय आज देखील सुरू आहे. चिंचणी समुद्रकिनाऱ्यावरती मार्तंड भाई जोशी उद्यान तयार करून ग्रामपंचायतइस अर्पण केले .
आज या ट्रस्टने समाजकार्याची उल्लेखनीय वाटचाल पूर्ण केली असून त्याचा रौप्य महोत्सव आमदार-खासदारांच्या उपस्थितीत चिंचणी येथील मार्तंड भाई जोशी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. वडिलांची इच्छा पूर्ण करण्याचं समाधान त्यांच्या शब्दांतून जाणवते. वाणगाव (जि. पालघर) येथील शिक्षण क्षेत्रात निस्वार्थी कार्य, दूरदृष्टी आणि समाजाभिमुख नेतृत्व यांचा सुंदर संगम म्हणजे बाबा जोशी. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणं म्हणजे शिक्षणसेवेच्या अखंड प्रवाहाला वंदन करण्यासारखं आहे. शिक्षण संस्थेचे विश्वस्त म्हणून त्यांनी केवळ प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत, तर संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावलं उचलली. गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, आधुनिक सुविधा आणि संस्कारक्षम वातावरण या चार स्तंभांवर त्यांनी संस्थेची उभारणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक यशाबरोबरच सामाजिक जाणीवही आत्मसात केली. महासंघाचे राज्याध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यभरातील संस्थांना एकत्रित ध्येयानं जोडण्याचं काम केलं. शिक्षण क्षेत्रातील धोरणात्मक प्रश्न, शिक्षकांचं हीत, ग्रामीण भागातील शैक्षणिक अडचणी यांसंदर्भात त्यांनी प्रभावी भूमिका मांडली. त्यांच्या नेतृत्वामुळं अनेक विधायक निर्णयांना गती मिळाली आणि शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम झाले.
बाबा जोशी यांची कार्यशैली पारदर्शक, निर्णयक्षम आणि लोकाभिमुख आहे. सहकार्याची भावना, सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि संघटन कौशल्य यांमुळं ते सर्वांच्या आदराचे केंद्रबिंदू ठरले आहेत. विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत आणि पालकांपासून समाजातील मान्यवरांपर्यंत सर्वांच्या मनात त्यांनी विश्वासाचं स्थान निर्माण केलं आहे. त्यांचे आजोबा मार्तंडभाई जोशी यांनी धार्मिक कार्यात विशेष योगदान देत आपल्या पाच मुलांसाठी मंदिरं उभारली. त्या कार्यामुळं त्यांना ‘बाबा महाराज’ म्हणून ओळख मिळाली. कुटुंबपरंपरेतील ही धार्मिक व सांस्कृतिक शाश्वतता जपण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या कार्यातून निभावली आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यात काँग्रेस संघटनेच्या बळकटीसाठी त्यांनी दीर्घकाळ योगदान दिलं. जिल्हा उपाध्यक्षपदापासून राज्यस्तरीय जबाबदारीपर्यंतचा त्यांचा प्रवास हा कार्यकर्त्यांशी संवाद, संयम आणि समन्वय यांचा आदर्श होता. सक्रिय राजकारणातून त्यांनी स्वेच्छेनं निवृत्ती स्वीकारली असली, तरी समाजकारणाची उर्मी अधिक दृढ झाली. त्यांनी वाणगाव ग्रामपंचायतीचे सदस्य ,माजी विश्वस्त, अध्यक्ष माध्यनदिन वाडी मुंबई गिरगाव, माजी विश्वस्त आचार्य भिसे शिक्षण संस्था कासा, अध्यक्ष अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ मुंबई महानगर अशी अनेक अनेक पदं त्यांनी भूषविली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावं, यासाठी त्यांनी श्री कुमार महाराज जोशी प्रतिष्ठान प्रतिष्ठान संचालित मार्तंड भाई (एम. बी.) जोशी इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून शिक्षणाचा दीप प्रज्वलित ठेवला आहे. येत्या वर्षामध्ये ज्युनियर कॉलेज सुरू होणार आहे. या कॉलेजमधून स्पर्धा परीक्षेला बसण्यायोग्य विद्यार्थी तयार करणं त्यांचा हा मानस आहे. वाणगाव एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त आणि ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, वाणगाव चे संस्थापक अध्यक्ष म्हणून ते सामाजिक बांधिलकी जपत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना सन्मानानं जगता यावं, हा त्यामागील हेतू आहे. त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ जोशी सध्या नाशिक येथील ‘मेरिएट ग्रुप’च्या ‘फोर पॉईंट शेरेटन’ या फाइव स्टार हॉटेलमध्ये जनरल मॅनेजर पदावर कार्यरत असून आपल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत. तरुणाईची ऊर्जा आणि व्यवस्थापन कौशल्य यामुळं त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. त्यांनी ‘बाबा जोशी फार्म’ येथे ‘होम स्टे’ ही आधुनिक संकल्पना राबवण्याचा निर्धार केला आहे. शून्यातून उभारलेली कारकीर्द, व्यवसायातील चढउतार, राजकीय जबाबदाऱ्या, कुटुंबीयांची अपेक्षा आणि सामाजिक बांधिलकी या सर्वांचा समतोल साधत त्यांनी आयुष्याचा प्रवास पूर्णत्वाकडं नेला. आज अमृत महोत्सवी वर्षाबद्दल ते स्पष्ट शब्दांत सांगतात, ‘स्वतःसाठी केलेलं यश तात्पुरतं असतं; तर समाजासाठी केलेलं कार्य शाश्वत असतं.’ राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी आयुष्य पूर्णपणे शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी वाहून घेतलं आहे. संघर्षातून घडलेली ही जीवनयात्रा आज समाजासाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहे. अमृतमहोत्सव म्हणजे आयुष्याच्या प्रवासातील एक सुवर्ण टप्पा. या प्रवासात त्यांनी जपलेली मूल्यं प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि समाजसेवा हीच त्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ पुढील पिढ्यांनाही लाभत राहो, हीच सर्वांची अपेक्षा. या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सतत कार्यरत राहण्याची प्रेरणा लाभो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!


















