banner 728x90

ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! ३३ लोकल गाड्यांमध्ये स्वतंत्र आसनव्यवस्था अन् विशेष डबा मिळणार, प्रवास होणार सुलभ..

banner 468x60

Share This:

दररोजच्या गर्दीशी दोन हात करत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पश्चिम रेल्वेकडून मोठा दिलासा मिळणार आहे. सुमारे ५० हजारांहून अधिक ज्येष्ठ प्रवाशांचा विचार करून ३३ लोकल गाड्यांमध्ये स्वतंत्र आसनव्यवस्था आणि विशेष डबा सुरू करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात या लोकलमध्ये बदल सुरू असून, लवकरच ज्येष्ठांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि सन्मानपूर्वक प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

मुंबईची लोकल ही लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असली तरी ज्येष्ठांसाठी हा प्रवास अनेकदा त्रासदायक ठरतो. सध्या प्रत्येक लोकलमध्ये केवळ १४ आसने राखीव असल्याने गर्दीच्या वेळी त्यांना बसण्याची संधी मिळत नाही. चढ-उतार करतानाही मोठा धोका निर्माण होतो. याच पार्श्वभूमीवर न्यायालयीन सूचनांनंतर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून सुरु केली आहे.

नव्या योजनेनुसार, पश्चिम रेल्वेने लोकलमधील मालडबा असलेल्या कंपार्टमेंटचे रूपांतर करून ते ज्येष्ठांसाठी राखीव करण्यात येत आहे. चर्चगेट दिशेकडील सातव्या डब्यात हा विशेष बदल केला जात आहे. या डब्यात सुमारे १३ ज्येष्ठ प्रवाशांना बसता येईल, तर ५० पेक्षा अधिक प्रवाशांसाठी उभे राहण्याची सोय असेल. यामुळे गर्दीत ढकलाढकली टाळून ज्येष्ठांना तुलनेने आरामदायी प्रवास करता येईल.

पश्चिम रेल्वेकडे सध्या ११२ लोकल रेक असून त्यापैकी ९६ रेक प्रत्यक्ष सेवेत धावत आहेत. उर्वरित रेक देखभाल-दुरुस्तीसाठी राखीव आहेत. या सर्व रेकमध्ये टप्प्याटप्प्याने अशा विशेष डब्यांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात ३३ लोकलमध्ये काम सुरू झाले असून, आतापर्यंत २७ लोकल गाड्यामध्ये बदल झाला आहे. उर्वरित लोकलमध्ये लवकरच हा बदल करण्यात येणार आहे.

का गरज होती..?

१. दररोज ५० हजारांहून अधिक ज्येष्ठ प्रवासी

२.केवळ १४ राखीव आसने प्रति लोकल

३.गर्दीत चढ-उतार करताना वाढता धोका

४.न्यायालयीन निर्देशांनंतर निर्णयाला वेग

सुरक्षिततेवर भर

या विशेष डब्यात दरवाज्याजवळ मजबूत आधार, पकडण्यासाठी रेलिंग आणि आपत्कालीन शिड्यांची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठांना गर्दीतही सुरक्षितपणे चढ-उतार करता येणार आहे.

आकडेवारी

* एकूण लोकल रेक – ११२

* प्रवाशांच्या सेवेत – ९६

* पहिल्या टप्प्यात – ३३ लोकल

* ज्येष्ठ प्रवासी -५०,०००+ दररोज

* सध्याची राखीव आसने – १४ प्रति लोकल

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!