मागील काही दिवसांपासून मुंबईतील तापामानात प्रचंड वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळं नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईतील तापमानाचा पारा पस्तिशीपार असल्याने मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील उष्णतेच्या लाटेचा प्रभाव रविवारीही कायम राहण्याची शक्यता आहे.
सरासरी कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसदरम्यान आहे. सांताक्रूझ वेधशाळेमध्ये शनिवारी किमान 26 आणि कमाल 35 अंश सेल्सिअस तापमान होते. त्यामुळे आजही उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवत आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, शनिवारी मुंबईचे कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस होते, मात्र आज या तापमानात वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिवाय, उष्णतेसह आर्द्रतेचे प्रमाण वाढले असून दुपारच्या कडक उन्हामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.
अनेक जिल्ह्यात तापमान 40 अंशाच्या पुढे गेलं आहे. त्यामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: विदर्भात उष्णतेची लाट आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 ते 45 अंशाच्या पुढे गेला आहे. दरम्यान, राज्याच्या बहुतांश भागात कोरडे हवामान कायम राहण्याची शक्यता असून, अंतर्गत भागांमध्ये उष्णतेची पातळी वाढलेली राहील. अनावश्यक घराबाहेर पडू नका, असे आवाहन महानगरपालिकेने केल आहे.
दरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट पाहायला मिळाली. विदर्भातील अकोला आणि अमरावती या दोन जिल्ह्यात विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. या दोन्ही जिल्ह्यात तापमानाचा पारा 45.6 अंशाच्या पुढे गेला आहे. तसेच भंडाऱ्यात 44 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील तापमान
अकोला – 45.6
अमरावती – 45.6
भंडारा – 44
बुलढाणा – 42.2
ब्रह्मपुरी – 44.1
चंद्रपुर – 44.2
गडचिरोली – 43.6
















