महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुन-जुलैमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून सुरू होणार आहे. राज्य मंडळाने पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा पुरवणी परीक्षा लवकर सुरू करण्यात येत आहे.
राज्य मंडळाने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित दहावी-बारावीच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार, बारावीची लेखी परीक्षा १६ जून ते ८ जुलै दरम्यान, तर दहावीची परीक्षा १६ ते ३० जून दरम्यान होणार आहे.
तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा १६ जून ते ८ जुलै दरम्यान होईल. यात माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचाही समावेश आहे. तर दहावीची परीक्षा १६ ते ३० जून दरम्यान होणार आहे.
दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.
त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले, सोशल मीडिया किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरण्यात येऊ नये. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास त्याला मंडळ जबाबदार राहणार नाही, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी केले आहे.

















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg