राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील अच्छाड–दहिसर मार्गावर ६ पादचारी उड्डाणपुलांसाठी निविदा प्रक्रिया सुरू
पालघर– पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील वाढत्या वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पादचारी उड्डाणपूल उभारण्याची मागणी सातत्याने केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडे लावून धरली होती. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले असून NHAI ने अच्छाड–दहिसर मार्गावरील ६ पादचारी उड्डाणपूल (Foot Over Bridge – FOB) उभारण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील अच्छाड ते दहिसर (कि.मी. ३८१.००० ते ५०२.०००) या मार्गावर EPC पद्धतीने ६ पादचारी उड्डाणपूल बांधण्याच्या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.
प्रस्तावित पादचारी उड्डाणपुलांमध्ये खालील ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे :
- चेनज ३९५+५२० – तलासरी
- चेनज ३९६+५०० – निलगिरी हॉटेल
- चेनज ४०६+५५० – आंबोली
- चेनज ४६६+९०० – खानिवडे
- तसेच बापानेफाटा व ससुनवघर
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहतुकीमुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगारांना रस्ता ओलांडताना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी विविध बैठका, पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष पाठपुरावा करून पादचारी उड्डाणपुलांची मागणी शासनाकडे मांडली होती.
या प्रकल्पामुळे महामार्गालगतच्या गावांतील नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडणे शक्य होणार असून अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने या महत्त्वाच्या कामाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
खा. डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे आभार मानले आहेत.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg