banner 728x90

रेल्वे प्रशासाचे दोन मोठे निर्णय ‘त्या’ 22 वर्षीय तरुणाची हत्या

banner 468x60

Share This:

मुंबईकरांची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल रेल्वेमध्ये 22 वर्षीय मयंक लोहार याची धावत्या लोकलमध्ये चाकू भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर रेल्वे पोलीस दलाने (GRP) प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला असून आता लोकलमध्ये बॅगांची मॅन्युअल तपासणी अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

गर्दीमुळे उपनगरीय स्थानकांवर बॅगेज स्कॅनरचा वापर करणे कठीण होत असल्याने, सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवाशांच्या लहान पाठीवरील बॅगांची (बॅकपॅक) तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. किरकोळ वादातून होणाऱ्या हिंसक घटनांमध्ये शस्त्रांचा वापर रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कामगारांनी त्यांच्या कामाची हत्यारे किंवा धारदार साधने ट्रेन प्रवासात न बाळगता कामाच्या ठिकाणीच ठेवावीत, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी बोरीवली रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असून प्रवासी संघटनांशी चर्चा केली आहे.

दरम्यान, या हत्याकांडानंतर रेल्वे प्रशासनात मोठे प्रशासकीय बदलही करण्यात आले आहेत. चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये 24 जून रोजी दरवाजा बंद ठेवण्याच्या किरकोळ वादातून 22 वर्षीय मयंक लोहार याची चाकूने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी रोशन सुवर्ण याने हल्ल्यानंतर प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत पळ काढला होता, मात्र त्याला कुर्ला परिसरातून अटक करण्यात आली आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय खोपिलकर यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर मार्गावरील काही रेल्वे पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्यात आल्या आहेत. हल्ल्यानंतर जबाबदारी निश्चित करण्यासाठी प्रशासन पातळीवर हालचाली वेगाने सुरू झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

याचदरम्यान, माहिम स्टेशनबाहेरही धक्काबुक्कीच्या वादातून 35 वर्षीय नवीन प्रसन्ना याच्यावर अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या सलग घटनांमुळे मुंबईतील लोकलमधील आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!