banner 728x90

किरण गायकरच्या मुद्द्यावर आज शिक्षणसंस्थेची बैठक, ‘रयतेचा कैवारी’चे कार्यकारी संपादकपद भूषविल्याने कारवाईचे संकेत

banner 468x60

Share This:

पालघर – योगेश चांदेकर

पालघर : ‘रयतेचा कैवारी’ नावाचे अनधिकृत डिजिटल दैनिक चालविल्याने निलंबित झालेल्या संपादक शिक्षक शाहू भारतीच्या याच वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक असलेले किरण लडकू गायकर हे आगाशी विरार अर्नाळा एज्युकेशन सोसायटीच्या विरारमधील अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिरात शिक्षकपदी कार्यरत आहेत. गायकर यांच्या या अनधिकृत कारभाराची या प्रतिष्ठीत शिक्षणसंस्थेने गांभीर्याने दखल घेतली आहे. गायकर यांच्या दुहेरी आणि अनधिकृत नोकरीमुळे शिक्षणसंस्थेच्या प्रतिमेला तडा गेला असून, त्यांच्यावर कारवाईसाठी आज कार्यकारिणीची बैठक होणार आहे. दरम्यान, या शिक्षणसंस्थेचा आतापर्यंतचा लौकिक पाहता गायकर यांच्यावर कठोर कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे. कार्यकारिणीने घेतलेल्या निर्णयानंतर नियमानुसार कारवाईसाठी अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविला जाणार असल्याची माहिती आहे.

banner 325x300

अनधिकृत डिजिटल दैनिकात कार्यकारी संपादकपदाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे शिक्षक किरण गायकर यांनी यासाठी संस्थेची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नव्हती तसेच पूर्वकल्पना दिली नव्हती, अशी माहिती शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष विकास वर्तक यांनी दिली आहे. शिक्षक किरण गायकर यांच्यावर कारवाई करण्याची आमची भूमिका आहे. रविवारी होणाऱ्या बैठकीत हा गंभीर विषय कार्यकारिणीसमोर ठेवून एकमताने निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविला जाईल. त्यांनी केलेल्या कारवाईला आम्ही मान्यता देणार आहोत, असेही या वर्तक यांनी सांगितले. गायकर यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम करण्याचा निर्णय आमच्या अपरोक्ष घेतला, त्यामुळे त्यांना या बैठकीला बोलावण्याचे प्रयोजन नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच शिक्षकाने शैक्षणिक कार्याकडेच लक्ष दिले पाहिजे. इतर कोणतेही काम करण्यापूर्वी संस्थेची परवानगी घेतली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, गायकर यांनी शाळेत शिक्षकपदी असतानाही ही दुसरी अनधिकृत वृत्तपत्रातील नोकरी करत शिक्षणसंस्थेला अंधारात ठेवले. तसेच त्यांची शैक्षणिक जबाबदारीही ते योग्यप्रकारे पार पाडू शकले नाहीत. त्यामुळे नेहमीच वादग्रस्त बाबींपासून अलिप्त राहिलेली ही शिक्षणसंस्था या प्रकरणातही कठोर भूमिका घेणार असल्याचे दिसून येत आहे.

‘लक्षवेधी’ने घेतला ‘लक्षा’चा वेध

निलंबित शिक्षक शाहू भारती यांनी ‘रयतेचा कैवारी’ या डिजिटल दैनिकांसाठी 2021 चा दिवाळी विशेषांक नाशिक येथील एका प्रिंटींग प्रेसमध्ये छापला होता. या 92 पानांच्या दिवाळी विशेषांकात राजकीय पक्ष, संस्था तसेच संघटनांसह इतरांच्या जाहिराती होत्या. विशेष म्हणजे या दिवाळी विशेषांकासाठी संबंधित प्रिंटींग प्रेसला एक लाख 10 हजार रुपये देण्यात आले होते, अशी विश्‍वसनीय माहिती ‘लक्षवेधी’ला मिळाली आहे. या अंकाच्या दोन हजार प्रती छापण्यात आल्या होत्या. त्यामुळे दिवाळी विशेषांकाच्या माध्यमातून लक्षावधीची उलाढाल झाल्याचे दिसून येत आहे.

दिवाळी विशेषांकात गायकरांची मोठी भूमिका

शिक्षक गायकर यांनी या अंकासाठीही कार्यकारी संपादक म्हणून संपूर्ण जबाबदारी पार पाडली होती. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेल्या तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी लता सानप यांनी त्या दिवाळी विशेषांकात ‘रयतेचा कैवारी’ या अनधिकृत दैनिकासाठी शुभेच्छा संदेशपर पत्रही लिहिले होते, असेही समोर आले आहे.

उपविभागीय अधिकाऱ्यांचा निर्णय कधी?

डिजिटल दैनिक प्रकरणात शिक्षण विभागाने शाहू भारती यांना निलंबित केले आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांनाही अहवाल पाठविण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, ‘आरएनआय’ची नोंदणी न करताच जवळपास चार वर्षे डिजिटल दैनिक चालविल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी कारवाईचा निर्णय कधी घेणार, याबाबत आता प्रश्‍न उपस्थित होत आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!