पालघर-योगेश चांदेकर
पालघर-: गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक प्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरावा, या उद्देशाने पालघर मधील टेंभोडे येथील राकेश सुभाष पाटील हे गेल्या १५ वर्षांपासून गणपती सजावटीच्या माध्यमातून समाजाला विविध ज्वलंत विषयांवर जागरूक करण्याचे काम करीत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात त्यांनी ‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा’ या विषयावर आधारित देखावा साकारला असून, भोंदू बाबा, अंधश्रद्धा आणि फसवणुकीच्या भूलथापांना बळी पडू नका, असा प्रभावी संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.
आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगातही अंधश्रद्धेचे प्रकार समाजात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष, गुप्तधन मिळवून देण्याचे आश्वासन, संकटे दूर करण्याच्या नावाखाली आर्थिक लुबाडणूक अशा विविध प्रकारे सर्वसामान्यांची फसवणूक केली जाते. अनेक वेळा अशा भोंदू बाबांच्या नादी लागून कुटुंबांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान होते. याच वास्तवावर प्रकाश टाकत पाटील यांनी यंदाच्या गणेश सजावटीतून समाजाला सावध करण्याचा प्रयत्न केला आहे.

भोंदूगिरीवर देखाव्यातून प्रहार!
‘देवावर श्रद्धा ठेवा; मात्र अंधश्रद्धेला बळी पडू नका’, हा यंदाच्या देखाव्याचा मुख्य संदेश आहे. देव आपल्या पाठीशी आहे; मात्र कोणत्याही भोंदू व्यक्तीच्या भूलथापांवर विश्वास ठेवून स्वतःचे आणि कुटुंबाचे नुकसान करून घेऊ नये, असे आवाहन या देखाव्यातून करण्यात आले आहे. विशेषतः ‘पैशांचा पाऊस पाडणे’, ‘गुप्तधन मिळवून देणे’ यांसारख्या आमिषांना बळी पडू नका, असा स्पष्ट संदेशही देण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात नाशिकच्या अशोक खरातपासून अनेक भोंदुगिरीची प्रकरणे उघडकीस आल्याने पाटील यांनी या वर्षीच्या देखाव्यासाठी हा विषय मुद्दाम निवडला.
सामाजिक प्रबोधनाचा वसा
राकेश पाटील यांच्या गणपती सजावटीचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी धार्मिक वातावरणासोबतच एखादा सामाजिक प्रश्न केंद्रस्थानी ठेवून देखावा साकारला जातो. गणेशोत्सवाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येतात. त्यामुळे याच संधीचा उपयोग समाजप्रबोधनासाठी व्हावा, या उद्देशाने विविध विषयांवर देखावे सादर केले जातात. गेल्या वर्षी ‘हुंडा देणार नाही, हुंडा घेणार नाही’ या संदेशातून हुंडाबळी आणि हुंडा प्रथेविरोधात जनजागृती करण्यात आली होती. त्यापूर्वी धार्मिक एकात्मता, ‘गो कोरोना गो’, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशा विविध सामाजिक आणि जनजागृतीपर विषयांवर देखावे साकारण्यात आले आहेत.
पुरस्कारांपेक्षा सामाजिक संदेश महत्त्वाचा
या सामाजिक आशयाच्या देखाव्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, विविध स्पर्धांमध्ये त्यांच्या देखाव्यांना महाराष्ट्रातून प्रथम पारितोषिकाचा मान अनेकदा मिळाला आहे; मात्र पुरस्कार किंवा स्पर्धेतील यशापेक्षा समाजाला एखादा सकारात्मक संदेश देणे हेच या उपक्रमामागचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे राकेश पाटील सांगतात. बाप्पाच्या उत्सवात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होतात. त्यामुळे केवळ आकर्षक सजावट करण्याऐवजी समाजातील ज्वलंत प्रश्न मांडून त्यावर विचार करण्यास प्रवृत्त करणारा देखावा उभारण्याचा प्रयत्न दरवर्षी केला जातो. मनोरंजनासोबत प्रबोधन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा हा उपक्रम परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
अंधश्रद्धेविरोधात विचारांची मशाल
यंदाच्या ‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा’ या देखाव्याच्या माध्यमातून अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीविरोधात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. श्रद्धा ही प्रत्येकाच्या वैयक्तिक भावविश्वाचा भाग असली, तरी श्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे. कोणत्याही संकटावर उपाय शोधताना विवेक, विज्ञान आणि कायदेशीर मार्गाचा आधार घेण्याची गरज या देखाव्यातून अधोरेखित करण्यात आली आहे. ‘देवावर श्रद्धा ठेवा; पण अंधश्रद्धेला बळी पडू नका’ हा साधा आणि थेट संदेश देत टेंभोडे येथील हा गणेशोत्सव देखावा यंदा सामाजिक प्रबोधनाची वेगळी वाट दाखवत आहे. उत्सवाच्या माध्यमातून समाजातील चुकीच्या प्रथा, अंधविश्वास आणि फसवणुकीच्या प्रवृत्तींवर भाष्य करण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.
कोट
मला अनेक पुरस्कार मिळाले असले, तरी पुरस्कारापेक्षाही माझ्या हातून समाजाचे प्रबोधन होऊन त्यातून काही लोक फसवणुकीपासून वाचले, तरी खूप झाले.
राकेश पाटील, सजावट, देखावे निर्मितीकार


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg