महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून गेल्या २४ तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण भागात पावसाने अक्षरशः कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
सखल भागांत २ ते ३ फूट पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड, अंधेरी आणि गोरेगाव परिसरात तुफान पाऊस पडला. अंधेरी सबवे अडीच फुट पाण्याखाली गेला. वीरा देसाई रोड, फिल्म सिटी रोड, संतोषनगर आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जोगेश्वरी भागात २-३ फूट पाणी साचल्याने वाहनांची मोठी कोंडी निर्माण झाली. वरळी आणि चेंबूरमधील अनेक सखल भागांत पाणी घुसले.
संध्याकाळी घरी परतणाऱ्या लाखो मुंबईकरांना पूर्व द्रुतगती महामार्गावर घाटकोपर ते ठाणे दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. वसई-विरारमध्ये वाघराळ पाड्यात ३ दुचाकी आणि २ कार वाहून गेल्या. सुदैवाने एका कार चालकाने उडी मारून आपला जीव वाचवला. नालासोपारा, कल्याण आणि ठाण्यातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. ठाणे महापालिका क्षेत्रात ८ तासांत ८२.७६ मिमी पावसाची नोंद झाली.
नवी मुंबईतील सानपाडा परिसरात रस्ते नदीसारखे दिसत होते. सायन-पनवेल हायवेवर वाहतूक कोंडी झाली. रायगडमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचले. पालघर जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. मुंबई आणि पुण्यात झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. चेंबूरमध्ये काल एका शाळकरी मुलाचा झाड पडून मृत्यू झाला होता.
हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg