banner 728x90

माथाडी कायदा कायम राहणार; वडाळ्यात कामगारांना मिळणार तीन हजार घरे – मुख्यमंत्री

banner 468x60

Share This:

माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण देणारा ऐतिहासिक माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपवला जाणार नसून तो कायम राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

कष्टकरी कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना सन्मानाचे जीवन मिळवून देण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे सांगतानाच, वडाळा येथील गृहप्रकल्पात सुमारे तीन हजार माथाडी कामगारांना हक्काची घरे दिली जातील आणि वाशी एपीएमसी मार्केट यार्डचा पुढील 50 वर्षांचा विचार करून जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

माथाडी चळवळीचे संस्थापक स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भव्य कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

या मेळाव्यास वन मंत्री गणेश नाईक, पणन मंत्री जयकुमार रावल, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार मनोज जामसुतकर, डॉ. प्राची पाटील, माजी खासदार संजीव नाईक, संदीप नाईक, विजय सावंत, एकनाथ जाधव, गुलाबराव जगताप, रविकांत पाटील, सुबोध रुणवाल, अविनाश रणखाम, निधी डोगरा, भरत चव्हाण, नगरसेविका ॲड.भारती पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि माथाडी कामगार उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणाले की, समाजातील शेवटच्या माणसाचा विचार करणारी अंत्योदयाची भूमिका पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडली. तीच भूमिका प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे काम अण्णासाहेब पाटील यांनी केले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून मुंबईत आलेल्या कष्टकरी, असंघटित कामगारांना संघटित करून त्यांनी माथाडी कायदा अस्तित्वात आणला आणि कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. आज माथाडी कामगार ताठ मानेने समाजात उभा आहे, त्याचे संपूर्ण श्रेय अण्णासाहेबांच्या त्यागाला जाते.

banner 325x300

माथाडी कायद्याच्या संरक्षणाचा पुनरुच्चार करताना मुख्यमंत्री म्हणाले की, हा कायदा कामगारांचे सुरक्षा कवच आहे. काही घटकांकडून हा कायदा संपवला जाईल असा संभ्रम निर्माण केला जात असला तरी शासन हा कायदा अधिक मजबूत करेल, तो संपू देणार नाही. मात्र, या पवित्र कामगार चळवळीच्या नावावर काही खोट्या टोळ्या तयार झाल्या असून त्या कामगारांचे नुकसान करत आहेत. या अनधिकृत प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी आणि खऱ्या कामगारांचे हित जपण्यासाठी कामगार नेते व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन कठोर पावले उचलली जातील. यासोबतच 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या पोत्यांसंदर्भातील नियमाची काटेकोर अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांनी पणन मंत्री जयकुमार रावल आणि कामगार विभागाचे कौतुक केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील सर्व 36 माथाडी मंडळांचे सक्षमीकरण आणि पुनर्रचना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मंडळांच्या कामकाजात पारदर्शकता राहावी यासाठी स्वतंत्र पॅनेलद्वारे लेखापरीक्षण केले जाईल. कामगारांचे वेतन, पीएफ, ग्रॅच्युइटी, बोनस, घरभाडे आणि अपघात नुकसानभरपाई यांसारखे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यात येतील. वडाळा येथील कामगारांच्या गृहप्रकल्पातील अडचणी दूर करून आवश्यक एफएसआय आणि परवानग्या देण्यात आल्या असून, सुमारे 3 हजार माथाडी कामगारांना आधुनिक व हक्काची घरे दिली जातील. तसेच कामगारांसाठी भविष्यात आणखी गृहप्रकल्प उभारण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील.

वाशी एपीएमसी मार्केटच्या आधुनिकीकरणावर भर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, 50 वर्षांपूर्वी स्थापन झालेले हे मार्केट त्या काळी आशियातील मोठे केंद्र होते. आता बदलत्या व्यापार पद्धतींचा आणि वाढत्या उलाढालीचा विचार करून वाशी मार्केटचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुनर्विकास करण्यात येईल. यासाठी जमिनीखाली आणि जमिनीवर आवश्यक तो सर्व एफएसआय शासन उपलब्ध करून देईल. या आधुनिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे माथाडी कामगारांना अधिक प्रमाणात शाश्वत रोजगार मिळेल.

शेवटी, माथाडी कामगारांच्या पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवाहन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कामगारांच्या मुलांनी केवळ माथाडी कामापुरते मर्यादित न राहता डॉक्टर, इंजिनिअर, सीए, सीएस आणि सनदी अधिकारी बनले पाहिजे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि ‘सारथी’च्या माध्यमातून माथाडी कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि कौशल्य विकासासाठी स्वतंत्र योजना आखल्या जातील, ज्यास राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. आम्ही सदैव तुमच्याच पाठीशी आहोत, अशी ग्वाही देत मुख्यमंत्र्यांनी कामगारांना आश्वस्त केले.

वन मंत्री गणेश नाईक यांनी माथाडी कामगारांच्या सामाजिक व शैक्षणिक उन्नतीवर भर दिला. अण्णासाहेब पाटील यांनी संघर्ष करून मिळवून दिलेल्या कायदेशीर संरक्षणामुळेच माथाडी कामगारांना समाजात मान-सन्मान मिळाला आहे, याचे स्मरण करून देत नाईक म्हणाले की, आता कामगारांच्या पुढच्या पिढीने केवळ श्रमापुरते मर्यादित न राहता शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर, सीए आणि सनदी अधिकारी बनले पाहिजे. कामगारांच्या आरोग्यासाठी माथाडी रुग्णालयाच्या सुविधांचे आधुनिकीकरण आणि वडाळा प्रकल्पातील घरांचे काम विनाविलंब पूर्ण व्हावे, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!