पालघर-योगेश चांदेकर
कातकरी व स्थलांतरित आदिवासी मुलांच्या सुरक्षा, आरोग्य आणि दर्जेदार शिक्षणासाठी श्रमजीवी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पालघर– मासवण येथील अनुदानित आश्रमशाळेत इयत्ता पहिलीमध्ये शिकणाऱ्या सात वर्षीय श्रेयांश अंबात या विद्यार्थ्याचा तापामुळे झालेला दुर्दैवी मृत्यू ही अत्यंत गंभीर घटना असून, या घटनेच्या पार्श्वभूमीवर मासवण आश्रमशाळा शासनाने तातडीने ताब्यात घेऊन शासकीय आश्रमशाळा म्हणून चालवावी, अशी मागणी श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष सीता घाटाळ यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
श्रेयांशच्या मृत्यूनंतर सीता घाटाळ यांनी मासवण आश्रमशाळेला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील शैक्षणिक, निवासी आणि आरोग्यविषयक परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
या आश्रमशाळेत विशेषतः कातकरी समाजातील तसेच डहाणू व इतर भागांतून रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या आदिवासी कुटुंबांतील मुले शिक्षण घेतात. पालकांच्या स्थलांतरामुळे या मुलांसाठी आश्रमशाळा ही केवळ शिक्षणाची जागा नसून त्यांचे घर आणि सुरक्षेचा आधार असल्याचे घाटाळ यांनी म्हटले आहे.
“आदिवासी पालक आपल्या मुलाला आश्रमशाळेत ठेवतो तेव्हा तो त्या मुलाला व्यवस्थेच्या विश्वासावर सोपवतो. त्या मुलाचे शिक्षण, आरोग्य आणि प्राणांची सुरक्षितता ही व्यवस्थेची जबाबदारी आहे,” असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
मासवण आश्रमशाळा शासनाने ताब्यात घेऊन तेथे पुरेसे गुणवत्तापूर्ण शिक्षक व कर्मचारी, सुरक्षित वसतिगृह, पौष्टिक आहार, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय आणि क्रीडा सुविधा निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
विशेषतः विद्यार्थ्यांसाठी २४ तास सक्षम आरोग्य व आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था, नियमित आरोग्य तपासणी, आजारी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात नेण्याची व्यवस्था आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या आरोग्याची नोंद ठेवणारी निश्चित कार्यपद्धती लागू करण्याची मागणीही श्रमजीवी संघटनेने केली आहे.
श्रेयांश अंबात यांच्या मृत्यूच्या संपूर्ण घटनाक्रमाची सखोल चौकशी करून निष्काळजीपणा किंवा त्रुटी आढळल्यास जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य केवळ शालेय शिक्षणापर्यंत मर्यादित न ठेवता डॉक्टर, अभियंता, वकील, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि अन्य व्यावसायिक क्षेत्रांत जाण्यासाठी त्यांना उच्च शिक्षणाच्या संधी, शासकीय वसतिगृहे, शिष्यवृत्ती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, असे घाटाळ यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
“श्रेयांशला आपण परत आणू शकत नाही; पण त्याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर तरी हजारो आदिवासी मुलांचे प्राण सुरक्षित करण्यासाठी व्यवस्था बदलू शकतो. त्या बदलाची सुरुवात मासवण आश्रमशाळेपासून व्हावी,” अशी भूमिका सीता घाटाळ यांनी मांडली आहे.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg