तुम्ही कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त वारंवार राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. उद्यापासून म्हणजेच 1 एप्रिल 2026 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टॅगच्या वार्षिक पास दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नियमित प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या खिशाला आता जादा कात्री लागणार आहे.
नेमकी किती झाली वाढ?
नव्या आर्थिक वर्षानुसार (2026-27) वार्षिक पासच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत या पासची किंमत 3000 रुपये इतकी होती. आता 1 एप्रिलपासून हाच पास घेण्यासाठी 3075 रुपये मोजावे लागणार आहेत. ही वाढ केवळ 75 रुपयांची दिसत असली तरी मोठ्या प्रमाणात प्रवास करणाऱ्यांसाठी हा अतिरिक्त आर्थिक बोजा ठरणार आहे.
वार्षिक पासचे नियम आणि मर्यादा
फास्टॅगचा वार्षिक पास घेणाऱ्या वाहनचालकांसाठी काही महत्त्वाचे निकष ठरवून देण्यात आले आहेत. हा पास 1 वर्ष किंवा 200 टोल क्रॉसिंगपर्यंत वैध असतो. एकदा का तुमच्या 200 ट्रिप्स पूर्ण झाल्या की, हा पास आपोआप सामान्य ‘पे-पर-यूज’ (Pay-per-use) मोडमध्ये परावर्तित होतो. त्यानंतर पुन्हा पास सुविधेचा लाभ घेण्यासाठी तो रिन्यू करावा लागतो. हा पास केवळ राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरील अंदाजे 1150 टोल प्लाझांवरच वापरता येतो. राज्य महामार्ग किंवा खासगी टोल रस्त्यांवर ही सवलत लागू होत नाही.
ज्या वाहनचालकांना नवीन पास घ्यायचा आहे किंवा जुना पास रिन्यू करायचा आहे, त्यांच्याकडे आजचा शेवटचा दिवस शिल्लक आहे. 31 मार्चच्या रात्रीपर्यंत जुने दर लागू राहतील. त्यामुळे वाढीव दर टाळण्यासाठी आजच पास काढून घेणे फायदेशीर ठरेल.
का वापरावा फास्टॅग वार्षिक पास?
किंमत वाढली असली तरी या पासचे अनेक तांत्रिक आणि व्यावहारिक फायदे आहेत. टोल नाक्यावर रांगेत उभे राहण्याची किंवा रोख सुट्या पैशांची कटकट उरत नाही. प्रवासादरम्यान खिशात रोख रक्कम ठेवण्याची गरज भासत नाही आणि रोजच्या प्रवाशांसाठी हा सर्वात स्वस्त आणि सुटसुटीत पर्याय मानला जातो. वाहनधारक अधिक माहितीसाठी Rajmarg Yatra अॅप किंवा NHAI च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

















