लोकभवन, मुंबई येथे आत्मनिर्भरतेचा स्नेहबंध
रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त सेवा विवेक ग्राम विकास केंद्र, पालघर यांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या आदिवासी भगिनींना महाराष्ट्राचे मा. राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांनी सन्मानपूर्वक लोकभवन, मुंबई येथे निमंत्रित केले. यावेळी आदिवासी भगिनींनी मा. राज्यपालांना प्रेम, स्नेह आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक असलेली बांबू राखी बांधून रक्षाबंधनाचा स्नेहबंध दृढ केला.
बांबूपासून आदिवासी भगिनींनी स्वतःच्या हस्तकौशल्यातून तयार केलेली ही राखी केवळ रक्षाबंधनाचे प्रतीक नसून आदिवासी महिलांच्या स्वावलंबनाची, कौशल्याची आणि आत्मविश्वासाची ओळख आहे.
या अभिनव उपक्रमाचे मा. राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांनी कौतुक केले आणि आदिवासी भगिनींच्या मेहनतीला, कौशल्याला तसेच त्यांच्या स्वावलंबनाच्या वाटचालीला प्रोत्साहन दिले.
पालघर जिल्ह्यात कार्यरत असलेले सेवा विवेक ग्राम विकास केंद्र आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या सोळा वर्षांपासून सातत्याने आणि समर्पित भावनेने ग्रामविकासाचे सेवाकार्य करीत आहे.
आदिवासी समाजासमोरील शिक्षण, आरोग्य, रोजगार ,स्थलांतर आणि पर्यावरण यांसारख्या विविध आव्हानांवर स्थानिक पातळीवर उपाय शोधत सेवा विवेकने ग्रामविकासाच्या माध्यमातून अनेक अभिनव उपक्रम राबवले आहेत.
विशेषतः बांबू हस्तकलेच्या माध्यमातून आदिवासी महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन आकर्षक व दर्जेदार वस्तू तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या उपक्रमामुळे आदिवासी महिलांना सन्मानजनक आणि स्वावलंबी रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून अनेक आदिवासी कुटुंबांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळाली आहे. त्यांच्या जीवनमानातही सकारात्मक बदल घडून येत आहेत.
सेवा विवेकच्या कार्याचे वैशिष्ट्य म्हणजे रोजगारनिर्मितीसोबत संस्कार, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करण्यावर दिलेला भर. आदिवासी समाजाच्या पारंपरिक चालीरीती, कला, संस्कृती आणि जीवनमूल्यांचे जतन व्हावे, तसेच पुढील पिढीपर्यंत त्यांचा वारसा पोहोचावा, यासाठी संस्था गेल्या सोळा वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील आहे.
रोजगारासोबत संस्कारांची जोड देत आदिवासी समाजामध्ये जागरूकता, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची भावना निर्माण करण्याचे कार्य सेवा विवेक करीत आहे.
बांबू राखीसारख्या उपक्रमातून स्थानिक संसाधनांचा उपयोग, पारंपरिक कौशल्यांचे संवर्धन, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि आत्मनिर्भरतेचा संदेश एकाच वेळी समाजापर्यंत पोहोचविला जात आहे.
रक्षाबंधनाच्या या पावन पर्वावर मा. राज्यपालांना बांधलेली बांबू राखी ही त्यामुळे केवळ स्नेहाची राखी न राहता आदिवासी भगिनींच्या स्वावलंबनाची, कौशल्याची आणि आत्मविश्वासाची प्रतीकात्मक अभिव्यक्ती ठरली आहे.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg