banner 728x90

बळीराजाला बाप्पा पावणार! राज्य सरकार शनिवारपूर्वी पहिली अधिसूचना काढणार, फडणवीसांची मोठी घोषणा

banner 468x60

Share This:

अधिसूचनेत विविध गोष्टींचा समावेश
दुष्काळी परिस्थितीसाठी समितीची स्थापना
रोहित पवारांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांचा टोला


राज्यात दुष्काळ जाहीर करावा अशा शेतकरी व विरोधी पक्षाच्या वाढत्या मागणीनंतर राज्य सरकार थोडं बॅकफूटवर गेले असून येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाबाबतची पहिली अधिसूचना काढण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

banner 325x300

यंदा राज्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. पावसाच्या दिवसात राज्यातील काही गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने विरोधी पक्षाने राज्य सरकारवर टिका करण्यास सुरुवात केली. अशात आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण परिस्थितीवर भाष्य करत दुष्काळाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या संदर्भात चर्चा आणि विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार आवश्यक माहिती गोळा करण्यात आली असून शनिवारपूर्वी दुष्काळासंदर्भातील पहिली अधिसूचना काढण्यात येणार आहे.

अधिसूचनेत ‘या’ गोष्टींचा उल्लेख

दुष्काळ कुठे आहे आणि कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत, याबाबत या अधिसूचनेत माहिती असेल. एखादा भाग पहिल्या टप्प्यात राहिला, तर दुसऱ्या टप्प्यात त्याचा समावेश केला जाईल. बुधवारपासूनच पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
बहुतांश भागात पिके करपली आहेत. मका, कापूस या पिकांवर त्याचा सर्वाधिक परिणाम दिसून येत असून कोकणातही भातपिकावर त्याचा परिणाम झाला आहे. तसेच पिण्याचे पाणी आणि जनावरांचा चारा यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.

दुष्काळी परिस्थितीसाठी समितीची स्थापना

फिल्डवरील परिस्थितीनुसार निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली असल्याची माहिती त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, या समितीत गिरीश महाजन, बाबासाहेब पाटील आणि अन्य मंत्री यांचा समावेश असेल, तर मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे समितीचे सचिव असतील.
आपण स्वतःही काही भागात जाऊन पाहणी करणार असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. मंत्र्यांनी बांधावर जाऊन पाहणीस सुरुवात केली आहे. आमदार देखील आपापल्या क्षेत्रात बांधावर जात असून यांच्याकडे शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी व अडचणी मांडता येतील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

रोहित पवारांच्या मागणीवर टोला

राष्ट्रवादी (श.प. गट) चे आमदार रोहित पवार यांच्या मागणीवर यावेळी मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला. ते म्हणाले की, मनात येतील ते आकडे सांगायचे व मागणी करायची. केवळ प्रसिद्धीसाठी मागणी करू नये असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले. तसेच केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असला तरी त्यांच्या मदतीची वाट पाहत बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे कर्नाटकाने दुष्काळ जाहीर केला नसल्याचे सांगत ते म्हणाले की, दुष्काळ जाहीर करण्यासाठी एनडीआरएफचे निकष पूर्ण करावे लागतात. कर्नाटकाने फक्त अधिसूचना काढली असून आपणही त्याप्रमाणे अधिसूचना काढत प्रक्रिया सुरू करत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!