पालघर-योगेश चांदेकर
आंदोलकांपुढे ‘महावितरण’चे लोटांगण
जुन्या मीटरच्या बिलांबाबतही तक्रारी
पालघर: स्मार्ट मीटर बसवण्याच्या मुद्द्यावरून पालघर जिल्ह्यातील वातावरण पुन्हा तापले असून, डहाणूत ‘महावितरण’विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आलेल्या ‘रास्ता रोको’ आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास विस्कळीत झाली. भरपावसात झालेल्या या आंदोलनात सुमारे पाच ते सहा हजार नागरिक सहभागी झाले होते.

‘स्मार्ट मीटर’मुळे वीजबिलात वाढ होत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी महावितरणच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्राहकांची संमती न घेता किंवा पुरेशी पूर्वसूचना न देता ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. सध्या बसविण्यात आलेले ‘स्मार्ट मीटर’ काढून त्याऐवजी जुने मीटर पुन्हा बसवावेत, तसेच नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याची सक्ती पूर्णपणे थांबवावी, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.
भरपावसात हजारो नागरिक महामार्गावर
गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आंदोलनाला सुरुवात झाली. पावसाची संततधार सुरू असतानाही मोठ्या संख्येने नागरिक, महिला आणि कार्यकर्ते महामार्गावर जमले. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देत ‘स्मार्ट मीटर’च्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली. या ‘रास्ता रोको’मुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही दिशांना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. माकपचे केंद्रीय नेते अशोक ढवळे, डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

विविध संघटन सहभागी
वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीसह स्थानिक पातळीवरील विविध संघटनांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला. पालघर जिल्ह्यातील विविध भागांसह लगतच्या परिसरातून नागरिक आंदोलनासाठी डहाणूत दाखल झाले होते. त्यामुळे आंदोलनाला मोठे स्वरूप प्राप्त झाले. डहाणू परिसरात ‘स्मार्ट मीटर’विरोधातील नाराजी यापूर्वीही उफाळून आली होती. काही काळापूर्वी झालेल्या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने ‘स्मार्ट मीटर’ काढून ते ‘महावितरण’च्या कार्यालयात जमा केले होते; मात्र त्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी महावितरणकडून पुन्हा ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली. आधी काढण्यात आलेले मीटर पुन्हा बसवण्यात येत असल्याने आंदोलकांनी तीव्र आक्षेप घेतला.
‘महावितरण’ बिले दुरुस्त करून देणार
‘रास्ता रोको’ आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. चर्चेदरम्यान ग्राहकांच्या तक्रारी आणि ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याच्या प्रक्रियेबाबत आंदोलकांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी जुन्या मीटरच्या वीजबिलांची पडताळणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आश्वासन दिले. पुढील १५ दिवस ही विशेष मोहीम राबवून ज्या ग्राहकांच्या बिलांमध्ये त्रुटी किंवा जादा आकारणी आढळेल, त्यांची बिले कमी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
‘स्मार्ट मीटर’ची सक्ती नाही
आंदोलनातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याची सक्ती केली जाणार नसल्याचे ‘महावितरण’ने स्पष्ट केले. नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवण्यासाठी ग्राहकांवर सक्ती केली जाणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ‘महावितरण’कडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलकांनी ‘रास्ता रोको’ तात्पुरता मागे घेतला; मात्र भविष्यात आश्वासनांची पूर्तता झाली नाही, तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
संभ्रम दूर करण्याचे आव्हान
वीज वितरण व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या उद्देशाने ‘स्मार्ट मीटर’ बसवले जात असले, तरी ग्राहकांमध्ये त्याबाबत निर्माण झालेला संभ्रम आणि अविश्वास दूर करणे ‘महावितरण’समोरचे मोठे आव्हान ठरत आहे. वीजबिल वाढण्याची भीती, मीटर बसवण्याच्या प्रक्रियेबाबत पारदर्शकतेचा अभाव आणि ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण यामुळे हा मुद्दा अधिक संवेदनशील बनला आहे.
कोट
‘ज्या ठिकाणी अद्याप जुने मीटर कार्यरत आहेत, तेथे नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार नाहीत. ‘महावितरण’ने दिलेल्या आश्वासनांवर आता कार्यवाही अपेक्षित आहे. त्याचा पाठपुरावा करू.
विनोद निकोले, आमदार, डहाणू


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg