पालघर-योगेश चांदेकर
पालघर: वेदविद्या, पौरोहित्य आणि संस्कृत परंपरेच्या जतनासाठी आयुष्यभर कार्य करणारे पालघर जिल्ह्यातील नामवंत वेदमूर्ती गजानन यशवंत नामजोशी यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना वेदांचे शिक्षण देणारे आणि पालघर परिसरात वेदपाठशाळेच्या माध्यमातून वेदपरंपरा पुढे नेणारे गुरुजी म्हणून ते परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, मुले आनंद आणि सुजन, सुना मधुरा आणि सुजाता, दोन नाती आणि एक नातू असा परिवार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जांभूळ आडी येथे जन्मलेल्या गजानन नामजोशी यांचे बालपण धार्मिक आणि संस्कारक्षम वातावरणात गेले. त्यांचे वडील १९३७ ते १९४७ या काळात पालघर येथील लक्ष्मीनारायण मंदिरात गुरुजी म्हणून कार्यरत होते. वयाच्या चौदाव्या वर्षी गजानन नामजोशी पालघर येथे आले आणि त्यानंतर त्यांचे आयुष्य वेदविद्या, पौरोहित्य आणि समाजसेवेशी जोडले गेले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दहावीची परीक्षा झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी लागणारी फी भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी नोकरीचा मार्ग स्वीकारला.
नोकरी करतानाही पौरोहित्याचा अभ्यास
काही काळ दुकानात काम केल्यानंतर ते १९६८ ते १९८७ या काळात कार्यरत होते. नोकरी सांभाळतानाही त्यांनी वेद आणि पौरोहित्याचा अभ्यास सोडला नाही. सफाळे आगारात नोकरी करत असताना ते महादेवशास्त्री नामजोशी यांच्याकडे भिक्षुकी आणि पौरोहित्याचे शिक्षण घेण्यासाठी जात असत. नोकरी आणि वेदविद्येचा अभ्यास अशी दुहेरी कसरत अनेक वर्षे सुरू राहिली. पुढे नोकरीतील अडचणी वाढल्यानंतर ‘आपले पळीभांडे बरे’ असा विचार करून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि मुंबईत गिरगाव मंडळ तसेच परांजपे शास्त्री यांच्या सहवासात पौरोहित्याचे काम सुरू केले; मात्र त्यांचा खरा ध्यास होता, तो वेदविद्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा. याच ध्यासातून १९९१ मध्ये त्यांनी पालघर येथील आपल्या राहत्या घरी ‘ऋग्वेद वेदपाठशाळा, पालघर’ येथे सुरू केली. या पाठशाळेत ऋग्वेदाच्या आश्वलायन शाकल शाखेचे शिक्षण दिले जात होते.
वेदसंपन्न पिढी घडवण्यावर भर
वेदपाठशाळा सुरू करण्यामागेही त्यांची भूमिका स्पष्ट होती. मुंजी झाल्यानंतर मुलांनी वेदांचे शिक्षण घ्यावे, असे ते पालकांना सांगत. सुरुवातीला काही पालकांनी मुलांना पाठवण्यास सुरुवात केली. हळूहळू पाठशाळेची माहिती परिसरातील अनेक गावांमध्ये पोहोचली आणि दूरवरूनही विद्यार्थी वेद शिकण्यासाठी येऊ लागले. ‘जे जे आपणासी ठावे, ते ते दुसऱ्याशी सांगावे, शहाणे करावे सकल जन’ या उक्तीला त्यांनी आपल्या कार्याचा आधार बनवला. स्वतःला जे ज्ञान मिळाले, ते पुढच्या पिढीला देणे, हेच त्यांनी आपले कर्तव्य मानले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर, सफाळे, वेढी, नगावे, कोरे, माहीम, केळवा, बोईसर, पामटेंभी, आलेवाडी, नांदगाव, चिंचणी, डहाणू, बहाड, पोखरण, वरोर, बोर्डी, उंबरगाव, संजान, मनोर, विरार, वसई, पनवेल आदी परिसरातील विद्यार्थी वेदविद्या शिकले. त्यांच्या मार्गदर्शनातून अंदाजे पाचशे विद्यार्थ्यांनी वेदाध्ययन केले.
कष्टकरी समाजालाही दिला रोजगार
वेद शिकवणे एवढ्यावरच त्यांचे कार्य थांबले नाही. विद्यार्थ्यांना वेदकर्माचे प्रत्यक्ष आणि प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे, तसेच गावातील आणि बाहेरील यजमानांना मोठे यज्ञ-याग प्रत्यक्ष पाहता यावेत, यासाठी त्यांनी स्वतःच्या खर्चाने विविध धार्मिक उपक्रम आयोजित केले. १९९५ ते २०२३ या तब्बल २८ वर्षांच्या कालावधीत त्यांनी विविध यज्ञ-याग आणि भागवत सप्ताहांचे आयोजन केले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष धार्मिक विधींचा अनुभव मिळावा, हा त्यामागचा उद्देश होता. वेदविद्या आणि पौरोहित्याबरोबरच त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. त्यांनी समिधा व्यवसाय सुरू केला. परिसरातील कष्टकरी समाजातील लोकांना या व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार आणि उपजीविकेचे साधन उपलब्ध करून दिले. पालघरपासून कल्याणपर्यंत तसेच पालघर ते गिरगाव, मुंबईपर्यंत ब्राह्मण समाजातील यजमानांना समिधा पुरवण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विविध ठिकाणी सन्मानपत्रांनी गौरवण्यात आले होते; मात्र सन्मानापेक्षा वेदविद्या पुढे नेण्याचे समाधान त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे होते
ज्ञानदानाची परंपरा
गजानन नामजोशी यांनी वेदपाठशाळेच्या माध्यमातून केवळ विद्यार्थ्यांना मंत्र आणि वेदपाठ शिकवला नाही, तर पौरोहित्याची शिस्त, धार्मिक विधींचे ज्ञान आणि परंपरेमागील संस्कार यांचीही शिकवण दिली. त्यांच्या विद्यार्थ्यांमधून पुढे अनेकांनी वेदपाठ, पौरोहित्य आणि धार्मिक कार्याची परंपरा पुढे नेली. त्यांच्या निधनाने पालघर परिसरातील वेदविद्येच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असली, तरी त्यांनी घडवलेले शेकडो विद्यार्थी आणि त्यांनी उभी केलेली वेदपाठशाळा हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख राहणार आहे.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg