आज 1 ऑगस्ट, नव्या महिन्याचा पहिला दिवस. आजच्याच दिवशी शनिवार असल्याने अनेकांचा वीकेंडचा मूड असणार हे खरं, पण आजच्या दिवशीच देशातील सर्वसामान्य जनतेला झटका बसू शकतो. त्याचं कारण म्हणजे दरवाढ.
या महिन्याच्या सुरूवातीपासूनच ग्राहकांना महागाईचा आणखी एक फटका बसण्याची शक्यता आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती, पश्चिम आशियातील (West Asia) सुरू असलेला संघर्ष, वाढलेला मालवाहतूक खर्च (फ्रेट कॉस्ट) आणि रुपयातील चढ-उतार यामुळे अनेक कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढवणार आहेत. उद्योग क्षेत्रातील माहितीनुसार, यंदाच्या वर्षात ग्राहकोपयोग वस्तूंच्या किंमती वाढवण्याची ही तिसरी वेळ असेल. त्यामुळे देशातील नागरिक, सर्वसामान्य जनतेच्याखिसावर ताण पडून त्यांचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
कोणत्या उत्पादनांच्या किंमती वाढणार?
मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्टपासून पॅकेज्ड चहा, हेअर ऑईल ( केसांसाठी वापरण्यात येणार तेल), रेफ्रिजरेटर, टीव्ही, रेडीमेड कपडे आणि प्रवासी वाहनांच्या किंमतींमध्ये 4 ते 8 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. कंपन्यांच्या मते, सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीची ही शेवटची दरवाढ असू शकते.
वाहन उत्पादक कंपन्यांचा निर्णय
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी ऑगस्टपासून आपल्या कारच्या किंमती 15 ते 30 हजार रुपयांनी वाढवू शकते. होंडा कार्स इंडियानेही 1 ऑगस्टपासून किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, तर मर्सिडीज-बेंझ इंडियाने पुढील तिमाहीत दरवाढीचे संकेत दिले आहेत. टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांनी यापूर्वीच या महिन्यात आपल्या वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही महागणार
ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या देखील ऑगस्टपासून टीव्ही, फ्रिज आणि इतर उपकरणांच्या किंमतींमध्ये 4 ते 6 टक्के वाढ करण्याच्या तयारीत आहेत. मेमरी चिप्सच्या वाढलेल्या किंमती, पुरवठा साखळीतील (Supply Chain) अडचणी आणि आयात खर्च वाढल्यामुळे कंपन्यांवरील खर्चाचा ताण वाढला आहे. त्यामुळेच ही दरवाढ होण्याची शक्यता आहे.
FMCG कंपन्यांवरही खर्चाचा ताण
पेट्रोलियम-आधारित पॅकेजिंग साहित्य, खाद्यतेल आणि इतर कच्च्या मालाच्या किंमती सातत्याने वाढत असल्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे, असं एफएमसीजी (FMCG) कंपन्यांचे म्हणणं आहे. त्यामुळे हा अतिरिक्त खर्च आता ग्राहकांवर टाकण्याशिवाय कंपन्यांकडे पर्याय उरलेला नाही.
किंमती वाढण्याचं कारण काय ?
तज्ज्ञांच्या मते, पश्चिम आशियातील सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. समुद्री मालवाहतूक खर्च वाढला आहे, तसेच कच्चे तेल आणि इतर वस्तूंच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. एवढंच नव्हे तर, रुपयाच्या घसरणीमुळे आयातही महाग झाली आहे. या सर्व कारणांमुळे कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढला असून आता त्या किरकोळ विक्रीच्या किंमती वाढवत आहेत.
मात्र असं असलं तरी (कंपन्यांच्या मते) ऑगस्टनंतर सध्या तरी मोठ्या दरवाढीची शक्यता कमी आहे. ओणमपासून सुरू होणाऱ्या सणासुदीच्या हंगामात ग्राहकांची मागणी मजबूत राहील, असा त्यांचा अंदाज असून या दरवाढीचा बाजारावर मर्यादित परिणाम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg